शिरूर लोकसभा मतदारंसघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. डॉ. कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका एका खासगी वाहिनीवर सुरू आहे. डॉ. कोल्हे हे उमेदवार असल्यामुळे या मालिकेचे प्रक्षेपण थांबवावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने या मालिकेचे प्रक्षेपण रोखता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. खासगी वाहिन्यांच्या मालिकांवर कारवाई करणे अशक्य असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

या मालिकेमुळे मतदारांवर प्रभाव पडेल असे या तक्रारीत म्हटले होते. निवडणूक आयोगाने मात्र या मालिकेचे प्रक्षेपण थांबवणे अशक्य असल्याचे म्हटले आहे.

डॉ. कोल्हे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या मतदारसंघात त्यांची लढत शिवेसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी होत आहे.