शिवछत्रपती पुरस्कार मिळविणाऱ्या सहा खेळाडूंची शनिवारी सायंकाळी शहरातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यात खेळाडूंसह क्रीडाप्रेमी उत्साहात सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर पुरस्कारार्थीचा आ. उत्तम ढिकले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नुकत्याच जाहीर झालेल्या शिवछत्रपती पुरस्कारांमध्ये नाशिकच्या सात जणांचा समावेश आहे. या पाश्र्वभूमीवर विविध क्रीडा संघटनांच्यावतीने शनिवारी सायंकाळी पुरस्कारार्थीच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी यशवंत व्यायामशाळेपासून पुरस्कारार्थीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत वाहनावर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करणारे अशोक दुधारे, आनंद खरे, तुषार माळोदे, स्नेहल विधाते, वैशाली तांबे व अजिंक्य दुधारे यांना आरूढ करण्यात आले.
महात्मा गांधी रस्ता, सीबीएस, शालीमार मार्गे ही मिरवणूक यशवंत व्यायामशाळेच्या मैदानावर आली. सत्कार सोहळ्यात पुरस्कारार्थीच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला.
नाशिकला आजपर्यंत तलवारबाजी या खेळाचे सर्वाधिक आठ शिवछत्रपती पुरस्कार मिळवून देणारे आणि त्यात आता नव्याने तीनची भर घालणारे अशोक दुधारे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, तर त्यांचा मुलगा आंतरराष्ट्रीय तलवारबाज अजिंक्य दुधारे याला तसेच त्यांचीच विद्यार्थिनी स्नेहल विधातेला उत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. मैदानावरील आणि मैदानाबाहेरील अशा दोन्ही क्षेत्रात झोकून काम करणारे आनंद ऊर्फ भाऊ खरे यांची उत्कृष्ट क्रीडा संघटक तथा कार्यकर्ता गटात निवड झाली. कठोर मेहनतीशिवाय यश नाही, असा संदेश देणाऱ्या ज्युदो या खेळासाठी तुषार माळोदे यांना उत्कृष्ट क्रीडा पुरस्कार, तर रोईंग खेळात बोट क्लबची विद्यार्थिनी वैशाली तांबे ही शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी ठरली. या पुरस्कार्थीचा आ. ढिकले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संजय पाटील, प्रशांत भाबड आदी उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 26, 2014 3:45 am