मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर (एक्सप्रेस-वे वरील) बंदुकीचा धाक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करणाऱ्या शिवसैनिकांचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी या प्रकरणामध्ये कारवाई करण्याची मागणी केलेली असतानाच आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी हाच व्हिडीओ शेअर करत, शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रामध्ये दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का?, असा प्रश्न विचारला आहे.

निलेश राणे यांनी व्हायरल झालेला व्हिडीओ आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करत या प्रकरणासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. “चालत्या गाडीतून पिस्तुल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे कोण? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टिकर, ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्रामध्ये?,” असं ट्विट निलेश यांनी केलं आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

व्हिडीओमध्ये रात्रीच्यावेळी वाहतुककोंडीमध्ये एक कारचालक बंदुकीचा धाक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गाडीच्या मागील बाजूस शिवसेनेची ओळख असणाऱ्या महाराष्ट्राच्या भगव्या रंगाच्या नकाशावरील वाघ असं चिन्ह दिसत आहे. व्हिडीओमध्ये ट्रकच्या गर्दीमधून वाट काढण्यासाठी एक कारचालक ड्रायव्हिंग सीटवरुन उजव्या हातात पकडलेली रिव्हॉलव्हर गाडीच्या खिडकीबाहेर काढतो आणि ट्रकच्या रांगेमधून पलीकडच्या लेनमध्ये जाताना दिसतो. या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचा लोगो असल्याचे व्हिडीओत स्पष्टपणे दिसून येत आहे.

एमआयएमच्या नेत्याने समोर आणला हा प्रकार

एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सर्वात आधी हा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर करत थेट शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या प्रकरणात कारवाई करण्याची मागणीही जलील यांनी केली.  “हे (दुष्य) महाराष्ट्रातील पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर आहे. वाहनवरील लोगो सर्व काही सांगत आहे. शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी मार्गक्रमण करीत असताना रिव्हॉल्व्हर्सचे ब्रँडिंग करीत होते. गृहमंत्री /पोलीस महानिरीक्षक या अधर्मची दखल घेऊ शकतात का?”,असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला आहे. या ट्विटमध्ये जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र पोलिसांच्या डीजीपींनाही टॅग केलं आहे.

हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत असून जलील यांनी ट्विट केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. या चालकाला अटक करावी अशी मागणी अनेकांनी केलीय. हा महाराष्ट्र आहे युपी-बिहार नाही असं म्हणत एकाने संबंधित चालकावर कारवाई करावी असं म्हटलं आहे. अनेकांनी गाडीचा क्रमांक या व्हिडीओत स्पष्ट दिसत असल्याने चालकाला शोधण्यास काही अडचण येणार नाही असंही नमूद केलं आहे.