शिवसेना नेते व युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी करिता कोल्हापूर व सांगली दौऱ्यावर असून त्यांनी आज(दि.20) कोल्हापूर येथील बापट कॅम्प या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना पाण्याच्या टाक्या तसेच एक महिना पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. परिस्थितीला घाबरू नका, संपूर्ण शिवसेना पूरग्रस्तांच्या पाठीशी उभी आहे, असा धीर त्यांनी यावेळी पूरग्रस्तांना दिला.

पूरग्रस्तांना शिवसेनेकडून सर्व प्रकारची मदत केली जात आहे. मदत करताना व्यक्ती, पक्ष हे महत्वाचे नाही. पक्ष, जात-पात, धर्म विसरून पक्षाकडून प्रत्येकाला मदत दिली जाईल. मदतीपासून कोणी वंचित असेल तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगा. आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे त्यांनी आश्वस्त केले. पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी तज्ञांशी बोलणे सुरू आहेत असेही ते म्हणाले. आंबेवाडी चिखली परिसरातील पूरग्रस्तांना भेटून त्यांच्याही व्यथा आदित्य ठाकरेंनी जाणून घेतल्या. तत्पूर्वी आदित्य ठाकरे यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय मंडलिक, खासदार धैयशील माने, खासदार राजन विचारे, खासदार डॉ. शिंदे, आमदार राजेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांनी याआधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे या पूरग्रस्त गावाची पाहणी केली होती. त्यांनी ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर काल सोमवारी रात्री दहा वाजता त्यांचे कोल्हापुरात आगमन झाले. सकाळी दहा वाजल्यापासून त्यांनी पूरग्रस्त परिसराची पाहणी करण्यास सुरुवात केली. दरम्यान उद्या बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.

पाहा व्हिडिओ –