राज्यात दुष्काळाचे संकट भले मोठे आहे. या दुष्काळी संकटाचे राजकारण शिवसेना कधीही करणार नाही, अन्य कोणीही असे राजकारण करू नये. दुष्काळात भरडलेल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्यासाठी शेतक ऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. त्यासाठी शिवसेना आग्रही असल्याचे सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पीडित शेतक ऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजनेचा शुभारंभ करण्यासाठी आदित्य ठाकरे हे रविवारी सोलापुरात आले होते. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शेतक ऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला.

होटगी रस्त्यावर आयोजित कार्यक्रमात त्यांच्या हस्ते उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, मोहोळ, मंगळवेढा भागातील दुष्काळग्रस्त शेतक ऱ्यांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. ठाकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकांपूर्वी महायुतीच्या पहिल्या पत्रकार परिषदेतच शिवसेनेने शेतक ऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीबद्दलचे धोरण स्पष्ट केले होते. सध्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून जी शेती कर्जमाफी झाली आहे, ती अपूर्ण आहे. त्यातही काही जण वंचित राहिले आहेत. त्यांना शेती कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यातील काही तांत्रिक बाबी सोडविण्यात येत आहेत.

राज्यात दुष्काळाची झळ गेल्या ऑक्टोबरपासून बसत असताना शिवसेनेने राजकारण बाजूला ठेवून ऑक्टोबरपासूनच दुष्काळग्रस्त भागासाठी मदतीचे काम हाती घेतले आहे. यापुढेही जोपर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही आणि दुष्काळाचे संकट दूर होत नाही, तोपर्यंत शिवसेना दुष्काळग्रस्तांसाठीचे मदतकार्य चालूच ठेवणार आहे. शेतकरीबांधवांनी दुष्काळाशी संघर्ष करीत असताना जीवाचे बरेवाईट करण्याचा विचारसुद्धा आणू नये, शिवसेना खंबीरपणे शेतक ऱ्यांच्या पाठीशी आहे, ग्वाही ठाकरे यांनी दिली. शिवसेनेचे २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हे सूत्र कायम आहे. सध्याच्या दुष्काळात तर शिवसेनेने शंभर टक्के समाजकारण आहे. असा दावाही त्यांनी केला. सेनेचे निवडून आलेल्या सर्व १८ खासदारांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळग्रस्तांना देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास खासदार राहुल शेवाळे व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह सेनेचे उपनेते आमदार तानाजी सावंत, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे, शहरप्रमुख तुकाराम चौगुले, महिला आघाडीच्या उज्ज्वला येलुरे, पुरुषोत्तम बरडे, साईनाथ अभंगराव आदी उपस्थित होते.

या वेळी २०२ मालवाहू वाहनांतून आणलेले धान्य दुष्काळग्रस्त भागातील चारा छावण्यांतील पशुपालकांसाठी वाटप करण्यात आले. यात ७५ वाहने सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी तर तर उर्वरित वाहने माढा लोकसभा मतदार संघातील पशुपालकांना वाटप करण्यासाठी पाठविण्यात आले. आदित्य ठाकरे यांनी दुपारी सांगोला भागास भेट देऊन तेथील चारा छावण्यांची पाहणी केली.