सोलापूर महापालिकेचे धडाकेबाज आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची तडकाफडकी बदली भाजपच्या सरकारने केल्यानंतर त्याविरोधात जनमानसात तीव्र नाराजीचे सूर उमटत असतानाच महिना उलटला तरी महापालिकेत नवा आयुक्त नियुक्त झाला नाही. या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत सह्य़ांची मोहीम हाती घेतली आहे.
व्यापाऱ्यांकडील थकीत एलबीटी वसुली तसेच महापालिकेच्या मालकीच्या व्यापार संकुलातील गाळ्यांची लिलाव प्रक्रिया तत्कालीन आयुक्त गुडेवार यांनी हाती घेतली होती. यापूर्वी गुडेवार यांनी पालिकेचा कारभार पारदर्शक चालवून भरीव विकास कामे हाती घेतली होती. त्यातून राजकीय पुढाऱ्यांचे हितसंबंध संपुष्टात आले होते. या पाश्र्वभूमीवर व्यापाऱ्यांची कड घेऊन सोलापूरचे भाजपचे पालकमंत्री विजय देशमुख व खासदार शरद बनसोडे यांनी आयुक्त गुडेवार यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असता गुडेवार हे बधले नव्हते. त्यामुळे अखेर त्यांची बदली झाली.
गुडेवार यांचे उत्तराधिकारी म्हणून शेखर गायकवाड यांची नियुक्ती झाली होती खरी; परंतु गायकवाड हे रुजू न होता त्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून जाणे पसंत केले. त्यामुळे गेले महिनाभर महापालिकेला  पूर्णवेळ आयुक्त मिळाला नाही. सद्यस्थितीत प्रशासकीयदृष्टय़ा महापालिकेची अवस्था निर्नायकी झाली आहे. पालिका आर्थिक डबघाईला आली आहे. या पाश्र्वभूमीवर जनमानसात भाजपच्या विरोधात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असतानाच भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने महापालिकेत पूर्णवेळ आयुक्त मिळावा म्हणून आंदोलन हाती घेतले आहे. सुरूवातीला या प्रश्नावर सह्य़ांची मोहीम चालविली जाईल. त्याची शासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख प्रताप चव्हाण व जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, महापालिकेत पूर्णवेळ आयुक्त येईपर्यंत जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे पालिकेचा कारभार सोपवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यासाठी काल सोमवारी सायंकाळी महापालिकेत विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन केले.