कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालाची सक्ती करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापूर कर्नाटक सीमेवर आरटीपीसीआर करोना चाचणी अहवालाची सक्ती केली जाऊ नये यासाठी आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. कर्नाटकमधल्या महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना प्रवेश मिळावा यासाठी शिवसेनेच्या वतीने कोगनोळी चेक पोस्टवर आंदोलन करण्यात येत आहे. यानंतर कर्नाटकचे सरकारचे नियम तोडून शिवसैनिक कर्नाटकमध्ये प्रवेश करणार आहेत.

कर्नाटक सरकारने महाराष्ट्रीत नागरिकांना आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालाची सक्ती केल्याने शिवसैनिक कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर आंदोलन करण्यासाठी जमले आहेत. आपल्या गाड्यांसह ते कर्नाटकात प्रवेश करणार आहेत. “कोल्हापूरातून कर्नाटकमध्ये जाणारी वाहने ही महाराष्ट्रात गेली पाहिजेत. गडहिंगलज, आजरा आणि चंदगडच्या वाहनांना आधार कार्ड किंवा लायसन्स पाहून सोडा. आरटीपीसीआरची सक्ती बंद करा. बेळगाव संकेश्वरला वाहने जात असतील तर वाहने थांबवा. महाराष्ट्रातून महाराष्ट्रात जाण्याच्या आम्हाला अधिकार आहे. जर प्रवेश दिला नाही तर आम्ही टोलनाके काढून टाकू. शिवसेना स्टाईलने ते टोलनाके उध्वस्त करु,” असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी कोविड रिपोर्टची सक्ती करण्यात आल्याने शिवसैनिक आक्रमक झाली आहे. शिवसेना आंदोलन करत असून कर्नाटक पोलीस आणि शिवसैनिक आमने-सामने आले आहेत. कर्नाटक सरकार परवानगी देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. कोगनोळी चेकपोस्टवर हे आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, बुधवारी या विरोधात कोगनोळी टोल नाक्यावर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग तासभर रोखून धरला होता. तणावग्रस्त वातावरणामुळे कर्नाटकचे पोलीस महासंचालक, बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी व पोलिसांचा प्रचंड फौजफाटा कोगनोळी नाक्यावर दाखल झाला होता.