चीनी मालावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन करीत मंगळवारी कोल्हापुरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना आणि कोल्हापूर जिल्हा व्यापारी महासंघाकडून चीनच्या मालाची होळी करण्यात आली. यावेळी भारत माता की जय, चीन सरकार हाय हाय, चीनी वस्तूंचा वापर बंद करा, स्वदेशी वापरा, देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
जगाला करोना विषाणूमुळे त्रस्त करणाऱ्या आणि जगात चीनी हुकुमशाही गाजवू पाहणाऱ्या चीनच्या विरोधात खदखद निर्माण झाली आहे. ही खदखद सर्वसामान्यांनी दाखवून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले, असल्याचे यावेळी सागण्यात आले.
करोनामुळे भारताचे अतोनात नुकसान झाले आहे. करोना ही चीनची उत्पत्ती आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. त्यातच चीन सीमेवर भारतावर कुरघोडी करू पहातोय, त्यामुळे चीनची मस्ती जिरवण्यासाठी देशवासीयांनी चीनी वस्तूवर बहिष्कार टाकून, स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
व्यापारी महासंघाचे सदानंद कोरगावकर, संजय गांधी निराधार योजनेचे किशोर घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. सराफ संघाचे कुलदीप गायकवाड, व्यापारी महासंघाचे संजय चंदवाणी, अमर क्षीरसागर, शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू हुंबे, दीपक गौड, शिवसेना, युवासेना व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2020 9:43 pm