शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या राज ठाकरे भेटीमुळे राज्यात तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला ऊत आला आहे. मात्र जयंत पाटील यांच्या या भूमिकेमुळे रायगड जिल्ह्य़ातील शेकाप आणि  शिवसेनेतील संबंध ताणले गेले आहेत. गेल्या आठ वर्षांपासून जिल्ह्य़ात दोन्ही पक्षांत असलेली युती घटस्फोटाच्या उंबरठय़ावर आली असल्याचे बोलले जात आहे. रायगड जिल्हा परिषदेवर २००५ पासून दोन्ही पक्षांचे वर्चस्व राहिले आहे. २००७ आणि २०१२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी युतीच्या माध्यमातून लढवल्या आहेत. शेकाप-सेना युतीचा हाच पॅटर्न कायम ठेवत दोन्ही पक्ष गेल्या लोकसभा निवडणुकीलाही सामोरे गेले होते. त्यामुळे रायगडमधून सेनेच्या अनंत गीते आणि मावळ सेनेचे गजानन बाबर हे मोठय़ा फरकाने विजयी झाले होते. दोन्ही पक्षांनी २००९च्या विधानसभा निवडणुकीत युतीचा हा पॅटर्न रायगडपुरता कायम ठेवला होता. त्यामुळे रायगडमधून शेकापचे तीन तर सेनेचे एक असे चार आमदार निवडून आले होते.      मात्र आता शिवसेनेच्या पक्षनेतृत्वाकडून शेकापला सन्मानजनक वागणूक दिली जात नसल्याचा दावा करत शेकापने युतीपासून फारकत घेण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीही खासदार अनंत गीते यांच्या कार्यप्रणालीबाबतही शेकाप नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. आरसीएफ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावरून दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला गेले आहेत.
      अशातच खासदार अनंत गीते यांची उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी शिवसेनेने शेकापला विश्वासात घेणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. गीतेंची उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी शेकापशी साधी चर्चाही करण्यात आली नाही. युतीबाबत विचारणाही केली गेली नाही. त्यामुळे सेनेशी फारकत घेत मनसेला जवळ करण्यास शेकापने सुरुवात केली आहे.
     जिल्ह्य़ात शेकाप-सेना युतीतील संबंध ताणले गेले असतानाच आमदार जयंत पाटील यांच्या ह्य़ा नव्या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र दोन्ही पक्षांना एकमेकांची साथ सोडणे परवडणारे नाही. कारण उत्तर रायगडात शेकापचे तर दक्षिण रायगडात सेनेचे प्राबल्य आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांसाठी पूरक आहेत. या मतांचे विभाजन झाले तर याची मोठी किंमत दोन्ही पक्षांना सोसावी लागणार आहे, तर दुसरीकडे मत विभाजनाचा थेट फायदा आघाडीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना जुळवून घेण्याशिवाय पर्याय नसल्याची चार्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे. साहजिकच जयंत पाटील यांच्या भूमिकेवर जिल्ह्य़ातील युतीचे भवितव्य अवलंबून आहे.