देशात सध्या शहरांची नावं बदलली जात आहेत. काही दिवसांपूर्वीच अलाहाबादचं नाव प्रयागराज करण्यात आलं तर फैजाबादचे नाव अयोध्या असे ठेवण्यात आले. ज्यानंतर आता शिवसेनेनेही महाराष्ट्रातल्य दोन शहरांची नावं बदलण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचे नाव संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव नगर करावे अशी मागणी शिवसेनेने पुन्हा एकदा केली आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यातल्या शहरांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला तो अंमलातही आणला मग हे देवेंद्र फडणवीस का करू शकत नाहीत? या शहरांची नावं बदलण्याचा निर्णय मुख्यमंत्री कधी घेणार? असे प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारले आहेत.

तर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनीही हीच मागणी लावून धरत शिवसेनेने खूप आधीपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलण्याची मागणी होते आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात म्हणजेच आघाडी सरकारच्या काळात या मागणीकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. आता या शहरांची नावं सरकारने बदलली पाहिजेत असेही कायंदे यांनी म्हटले आहे.

गुजरात सरकारनेही अहमदाबादचे नाव कर्णावती करण्याचा विचार सुरु केला आहे. आम्ही लवकरच त्यासंबंधीचा निर्णय घेऊ असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणींनी म्हटले आहे. जर उत्तर प्रदेश, गुजरात या ठिकाणी नावं बदलली जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही? असेही संजय राऊत यांनी विचारले आहे.