News Flash

शिवसेनेचा भाजपला झटका!

पालकमंत्रीपद काढून घेतल्यापासून शिवसेना चवताळली होती.

पालकमंत्रीपद काढून घेतल्यापासून शिवसेना चवताळली होती. त्यातच भाजपमधील अंतर्गत वाद आणि बंजारा समाजाचा शिवसेनेकडे वळलेला कल यातून काँग्रेस आणि भाजपचे प्रस्थ असलेल्या यवतमाळ जिल्हा परिषदेत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारीत सर्वाधिक जागाजिंकल्या आहेत.

लोकसभा, विधानसभा, विधान परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत जिल्हा काँग्रेसमुक्त झाला. विधानसभेत ७ पकी ५ आमदार भाजपचे निवडून आले. मदन येरावार तर पालकमंत्री झाले. नगरपालिका निवडणुकीतही बऱ्यापकी सत्ता आली. मात्र, दोन वर्षांत असे काय घडले की, मतदारांनी भाजपपेक्षा सेनेला जवळ केले, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जि.प.च्या ६१ सदस्यांमध्ये सेना २०, भाजप १८, काँग्रेस व राकांॅ प्रत्येकी ११ आणि एक अपक्ष, असे संख्याबळ आहे. गेल्या वेळी भाजपचे केवळ ४ आणि सेनेचे १४ सदस्य होते. ‘४ वरून आम्ही १८ वर गेलो आणि सेना १४ वरून २० गेली, याचा अर्थ आम्हीच पुढे आहोत. शिवाय, मतदानाच्या बाबतीतही आम्ही सेनेपेक्षा ३३ हजारांनी पुढे आहोत. जेथे ग्रामीण भागात भाजप शून्य होता तेथे गावोगावी कमळ पोहोचले, ही आमची उपलब्धी आहे’, असे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी म्हटले आहे. अर्थात, स्वबळावर सत्ता प्राप्त होऊ शकली नाही, हा चिंतनाचा विषय असल्याचेही डांगे यांनी मान्य केले. निवडणूक निकाल लक्षात घेता ग्रामीण भागात भाजपच्या नोटाबंदी, शेतमालाला नसलेला भाव, खंडित वीजपुरवठा, फसलेली पिकविमा योजना, न झालेली कर्जमाफी, या धोरणांचा असंतोष कायम असल्याचे स्पष्ट  झाले.

आता चिंतन

विधानसभेत जिल्ह्य़ातील सात पकी मदन येरावार, राजू तोडसाम, राजेंद्र नजरधने, संजीव रेड्डी बोतकूलवार आणि प्राचार्य डॉ. अशोक उईके, असे भाजपचे पाच आमदार आहेत. पण पक्षांतर्गत वादाचा फटका भाजपला बसला. विदर्भात लोकसभेपासून भाजपला एकहाती यश मिळत असताना यवतमाळ आणि अमरावती या दोन जिल्ह्य़ांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. राठोड यांचे पालकमंत्रीपद काढून ते भाजपच्या येरावार यांच्याकडे सोपविण्यात आले, पण ते राज्यमंत्री किंवा पालकमंत्री म्हणून प्रभाव पाडू शकलेले नाहीत.

..म्हणे आमचे यश

जि.प.च्या ६१ सदस्यांमध्ये सेना २०, भाजप १८, काँग्रेस व राकांॅ प्रत्येकी ११ आणि एक अपक्ष, असे संख्याबळ आहे. गेल्या वेळी भाजपचे केवळ ४ आणि सेनेचे १४ सदस्य होते.  मतदानाच्या बाबतीतही आम्ही सेनेपेक्षा ३३ हजारांनी पुढे आहोत. जेथे ग्रामीण भागात भाजप शून्य होता तेथे गावोगावी कमळ पोहोचले, ही आमची उपलब्धी आहे’, असे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी म्हटले आहे.

गटबाजीने पराभव

  • आरक्षण धोरणामुळे भाजपला योग्य उमेदवार शोधताना नाकीनऊ आले होते. आयाराम-गयारामांना जवळ करूनही त्याचा फारसा लाभ मिळाला नाही. काँग्रेसचे माजीमंत्री संजय देशमुख, योगेश पारवेकर, राकाँ. चे माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, संध्या इंगोलेंसारखे अनेक आयाराम-गयाराम नेते ऐनवेळी भाजपत गेल्याने त्याचा फारसा लाभ मिळाला नाही किंवा मुख्यमंत्री, केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचे दौरेही फारसे कामात आले नाही.
  • पालिका निवडणुकीच्या वेळी असलेली पक्षांतर्गत गटबाजी जि.प. निवडणुकीत दिसली नाही, पण मतदारांनी भाजपच्या आयाराम-गयाराम धोरणाबद्दल नाराजीच व्यक्त केली. याउलट शिवसेनेने स्वबळावर लढत भाजपला क्रमांक एकचा शत्रू मानून कडवी लढत दिली.
  • निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडील पालकमंत्रीपद काढून घेण्यात आले आणि त्यांना सहपालकमंत्री करण्यात आले. ही बाब शिवसेनेला झोंबली होती.
  • शिवसेनेने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा केला होता. राठोड यांच्यावर झालेल्या अन्यायाची जिल्ह्य़ात ताकद असलेल्या बंजारा समाजात साहजिकच प्रतिक्रिया उमटली.
  • दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, उमरखेड, महागाव या बंजाराबहूल मतदारसंघांतील २९ पकी १४ सदस्य शिवसेनेचे तर भाजपचे केवळ तीनच उमेदवार निवडून आले.
  • बंजारा समाजाची काँग्रेसची परंपरागत मतपेढी संजय राठोडांनी मेहनतीने सेनेकडे वळवली. शिवसेनेकडे संजय राठोड आणि भावना गवळींसारखे नेते, राज्यातील सत्तेत असलेला वाटा आणि ग्रामीण भागात १५ वर्षांपासून रोवलेली पाळेमुळे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्तेत असूनही घेतलेली आक्रमक भूमिका, या साऱ्यांचा एकत्रित परिणाम सेना जि.प. निवडणुकीत क्रमांक एकवर राहण्यात झाला.
  • या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सख्याबळ ५० टक्क्यांनी कमी झाले. गेल्या ६० वर्षांत पूर्वाश्रमीचा जनसंघ किंवा आताचा भाजपला ग्रामीण भागात स्थान नसल्याने जिल्हा परिषदेत त्यांचे दोन-चारपेक्षा जास्त सदस्य नव्हते.
  • प्रथमच गावोगावी कमळ निदान पोहोचले. सेनेच्या खालोखाल जागा मिळवल्या, हेच काही कमी नाही, असे भाजप नेते मानत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2017 1:33 am

Web Title: shiv sena bjp 6
Next Stories
1 स्थानिक समस्यांकडे दुर्लक्ष भाजपला भोवले
2 स्वाभिमानीत फूट पाडण्याचा भाजपवरील आरोप निराधार
3 सोलापूर जिल्हा परिषदेत सत्तेचा सोपान अखेर राष्ट्रवादीकडेच
Just Now!
X