पोलिसांचा सौम्य लाठीमार

पंचायत समितीच्या इमारत लोकार्पण सोहळ्यानिमित्त रविवारी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी श्रेय लाटण्यावरून शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड घोषणाबाजी होऊन राडा झाला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले.

नव्याने बांधलेल्या प्रशासकीय कार्यालयाचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे व महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पाच जानेवारी २०१७ रोजी लोकार्पण होणार होते. परंतु आदल्या दिवशीच पदवीदर मतदार संघाची आचारसंहिता लागल्याने सोहळा रद्द करावा लागला होता. त्याच दिवशी सोमवार बाजार परिसरात असणाऱ्या सभागृहात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी कार्यालयाच्या उद्घाटनाची औपचारिक घोषणा केली होती. त्याच महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचीही आचारसंहिता लागली. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सत्तांतर होऊन राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष सदस्यांना बरोबर घेऊन डॉ. अद्वय हिरे यांनी भाजपचा झेंडा पंचायत समितीवर फडकवला.

सत्ता मिळाल्यावर प्रशासकीय कार्यालयाचे पुन्हा लोकार्पण करण्याचा घाट भाजपच्या नेत्यांनी घातला. त्यानुसार रविवारी दुपारी या कार्यालयाचे उदघाटन खा. संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते, तर संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्याचे नियोजन करण्यात आले. दोन्ही नेते अद्वय हिरे यांच्या निवासस्थानी हजर झाले. या कार्यक्रमाबद्दल माहिती मिळताच युवा सेनेचे जिल्हा संघटक विनोद वाघ, भूषण बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक मोठय़ा संख्येने पंचायत समिती परिसरात जमा झाले.

यावेळी शिवसेना व भाजप कार्यकर्ते समोरासमोर आल्याने घोषणाबाजी सुरू झाली. त्यामुळे खा. संभाजीराजे भोसले, डॉ. भामरे यांनी हिरे यांचे निवासस्थान सोडले नाही. अखेर अद्वय हिरे हे अनेक कार्यकर्त्यांसह कार्यालयात पोहचले. त्यांना पाहताच शिवसैनिक संतप्त झाले. शिवसैनिकांनी त्यांना प्रशासकीय कार्यालयात जाऊ देण्यास विरोध केला.

भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना प्रत्युत्तर देत घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांसह हिरे हे कार्यालयात दांडगाईने शिरण्याचा प्रयत्न करीत असताना दोन्ही बाजूकडून घोषणाबाजी करण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला.

हिरे यांनी शिवसैनिकांना न जुमानता सभापतींच्या दालनात प्रवेश केला. त्याच ठिकाणी त्यांनी उद्घाटनाची औपचारिक घोषणा केली. पोलिसांनी यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करून बाहेर काढून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.