युती तुटल्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेतील शिवसेना- भाजप युतीचा घरोबा संपुष्टात आला असल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेच्या नगरसेवकांनी वीजबिल वाचवणाऱ्या एलईडीचे काम निविदा काढल्याशिवाय देऊ नये, अशी सूचना केली. शिवसेनेकडे भाजपपेक्षा अधिक नगरसेवक असल्याने भाजपचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांना या सूचना स्वीकाराव्या लागल्या. त्यामुळे युतीचा संसार आता वेगळा झाला आहे, हे आजच्या जनरल सभेतून दिसून आले आहे.
शहरात बसवण्यात येणाऱ्या एलईडीवरून नगर परिषदेची सभा गाजली असून शिवसेना-भाजपमध्ये फाटाफूट झाल्यानंतर झालेल्या या पहिल्याच सभेत मर्जीतल्या कंपनीला ठेका देण्याचा प्रयत्न केल्याने शिवसेनेने भाजपला ‘शह’ दिला. निविदा काढल्याशिवाय हे काम होऊ नये, अशी मागणी सेना नगरसेवकांनी लावून धरली. भाजपच्या नगराध्यक्षांना संख्याबळामुळे ही सूचना मान्य करावी लागली.
विधानसभा निवडणुकीनंतर रत्नागिरी नगर परिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा गुरुवारी झाली.
सध्या राज्यातील राजकीय घडामोडी घडत असतानाच स्थानिक पातळीवरच त्याचे पडसाद पाहायला
मिळत आहेत. नगराध्यक्षपदावरून शिवसेना-भाजप या दोन पक्षांमध्ये कुरबुर सुरू असतानाच उपनगराध्यक्षपदाचा मुद्दा कळीचा ठरला होता. त्यामुळे आरोप- प्रत्यारोप होणार याची चर्चा होतीच.
अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही सभा गाजली.
सुरुवातीच्या खेळीमेळीच्या वातावरणात सुरू झालेली सभा रत्नागिरी शहरात पोलवरून अस्तित्वातील दिवे बदलून त्याऐवजी एलईडी दिवे बसविण्यासाठी मे. करंट टेक्नॉलॉजीस व डेटम सिस्टम प्रा. लि. पुणे यांनी प्रस्ताव दिले असून या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबतचा विषय सभागृहात चच्रेला आला यावरून शिवसेना व भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. थेट मंजुरी देण्यापेक्षा निविदा मागवा व ज्या पद्धतीने निविदा येतील त्या मंजूर करून त्यांना काम द्या, अशी सूचना शिवसेना नगरसेवकांनी केली. एलईडीचा विषयही चांगलाच गाजल्याने शिवसेनेने सभागृहात भाजपला जोरदार ‘करंट’ देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.