जिल्हा परिषद निवडणुक

राज्यात सेना-भाजप युतीत श्रेयवादामुळे कुरबुरी सुरू आहेत. दोन्ही पक्षांतील संबंध ताणले गेले आहेत. कुरघोडय़ांचे राजकारण दोन्ही पक्ष करीत आहेत. तरीही रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पक्षांत पुन्हा एकदा निवडणूकपूर्व युतीचे संकेत मिळत आहेत. रायगड जिल्हा परिषदेसाठी शेकाप राष्ट्रवादीने यापूर्वी आघाडीची घोषणा केली होती. आता शिवसेना आणि भाजपची मधेही युती होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांत युतीबाबत प्राथमिक बोलणी झाली असून जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर युतीबाबत अधिकृत घोषणा केली जाणाची शक्यता आहे.

रायगड जिल्हा परिषदेवर सध्या शेकाप आणि राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. शिवसेना हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. जिल्हा परिषदेतील सध्याचे पक्षीय बलाबल लक्षात घेतले तर राष्ट्रवादीचे २१, शेकापचे १८, शिवसेनेचे १४, काँग्रेसचे ६, तर भाजपचा एक सदस्य गेल्या निवडणुकीत विजयी झाले होते. मात्र पाच वर्षांत झालेल्या राजकीय उलथापालथीत शेकापचे दोन तर राष्ट्रवादीचे तीन सदस्य पक्षातून बाहेर पडले. त्यामुळे दोन्ही पक्षांची ताकद काही प्रमाणात घटली. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापने आगामी जिल्हा परिषद निवडणूक एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा मानस यापूर्वी बोलून दाखवला आहे. मात्र शिवसेना-भाजप यांच्या मतविभाजनाचा थेट फायदा शेकाप-राष्ट्रवादी आघाडीला होण्याची शक्यता आहे. हे लक्षात आल्यामुळे आता सेना-भाजपकडून युतीबाबत बोलणी सुरू झाली आहे.  जिल्ह्य़ातील नऊ नगरपालिकांसाठी नुकत्याच निवडणुका झाल्या होत्या. यात निवडणुकीत सेना-भाजप दोन्ही पक्ष स्वबळावर लढले होते. मुरुड आणि माथेरान येथे सेनेला, तर उरण येथे भाजपला स्वबळावर सत्ता आणण्यात यश मिळाले असले तरी, इतर ठिकाणी मात्र राष्ट्रवादी आणि शेकापला आघाडीला सेना-भाजप मतविभाजनाचा फायदा झाला होता. खोपोली आणि श्रीवर्धन नगरपालिकांमध्ये दोन्ही पक्षांना याची मोठी किंमत चुकवावी लागली होती.

ही बाब लक्षात घेऊन आता सेना-भाजपने युतीबाबत बोलणी सुरू केली आहेत. या संदर्भात पनवेल आणि अलिबाग येथे दोन्ही पक्षांच्या संयुक्त बठका झाल्या आहेत. दोन्ही पक्षांनी ही निवडणूक एकत्रित येऊन लढवण्यास तत्त्वत: मान्य केले आहे. मात्र जागावाटपाचा तिढा अजून कायम आहे. जिल्ह्य़ात सेनेच्या तुलनेत भाजपची ताकद मर्यादित आहे, मात्र नगरपालिका निवडणुकीतील यशामुळे त्यांच्या आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे युती केली तरी सन्मानजनक जागा मिळाव्यात, अशी आग्रही मागणी भाजपची आहे. काही ठिकाणी काँग्रेसला सोबत घेता येईल का, यावरही चर्चा सुरू आहे. पक्षश्रेष्ठींकडून याबाबत दोन्ही पक्ष मार्गदर्शन घेणार आहेत. जागावाटपाबाबत निर्णय झाल्यानंतर सेना-भाजप युतीवर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

‘जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेशी बोलणी सुरू आहे. मात्र जागावाटपाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. युती केली तर सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी आम्ही आग्रही आहोत.’

आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष भाजप

‘भाजप हा आमचा नसíगक मित्रपक्ष आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत युती व्हावी, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. जिल्हय़ात भाजपची ताकद फारशी नाही. त्यामुळे जागावाटपात ताठर भूमिका न घेता भाजपने लवचीक धोरण स्वीकारावे.’

महेंद्र दळवी, शिवसेना नेते