News Flash

युतीमुळे पूर्व विदर्भात काही मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढती?

शिवसेनेने यापूर्वी जिंकलेल्या मतदारसंघांमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आले होते.

युतीमुळे पूर्व विदर्भात काही मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढती?
(संग्रहित छायाचित्र)

प्रशांत देशमुख, वर्धा

गेल्या साडेचार वर्षांतील स्वबळाच्या गुर्मीवर पांघरूण टाकत झालेल्या भाजप-सेना युतीला आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्व विदर्भातील काही मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढतींची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेने यापूर्वी जिंकलेल्या मतदारसंघांमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आले होते. आता हे मतदारसंघ परत मिळावेत, अशी शिवसेनेची अपेक्षा असली तरी भाजप त्याला राजी होईल का, यावर सारे अवलंबून आहे.

युतीची घोषणा झाल्यानंतर सर्वाधिक चर्चेत हिंगणघाट मतदारसंघ आहे. पूर्व विदर्भात हिंगणघाट मतदारसंघ सेनेचा गड म्हणून ओळखला जातो. या खेरीज चंद्रपूर जिल्हय़ातील भद्रावती, गोंदिया व भंडारा विधानसभा मतदारसंघावर सेनेचा दावा राहिला. पूर्व विदर्भात सेनेपेक्षा नेहमी भाजपचेच वर्चस्व असण्याच्या पाश्र्वभूमीवर सेना त्यांच्या मानल्या जागांवर पाणी सोडणे शक्य नाही, पण नेमक्या याच जागांवर गेल्यावेळी भाजपने झेंडा रोवला. आता परत भाजपकडून या जागा हिसकावून घेण्यासाठी सेनेला स्वबळाचा उमाळा येऊ शकतो.

२५ वर्षांपासून असणारी युती २०१४मध्ये तुटल्यानंतर हिंगणघाटला भाजपचे समीर कुणावार हे अशोक शिंदे यांचा पराभव करून निवडून आले होते. वर्धा जिल्हय़ात युती असताना हिंगणघाट व वर्धा मतदारसंघ सेनेकडे असायचा. या दोन्ही ठिकाणी आता भाजपचे आमदार असल्याने युतीतील बेबनावाचे मुख्य केंद्र वर्धा जिल्हा राहण्याची शक्यता व्यक्त होते. विदर्भात हिंगणघाट क्षेत्र हे सेनेचा गड म्हणून ओळखले जाते. इथून तीन वेळा आमदार राहिलेले शिंदे युतीच्या पहिल्या राजवटीत मंत्रीसुद्धा झाले होते. एवढेच नव्हे तर पूर्व विदर्भातील ते सेनेचे एकमेव उपनेते असल्याने तसेच ‘मातोश्री’चा विशेष विश्वास असलेले नेते, अशी ओळख असल्याने शिंदेंच्या उमेदवारीला सेना प्रतिष्ठेची करण्याची संभावना आहे. जागावाटपात हिंगणघाटसाठी सेना अडून बसणार, असे म्हटले जाते.

भाजपचे आमदार समीर कुणावार हे पक्षनेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू समजले जातात. नव्याने स्थापन झालेल्या ‘सिंदी ड्रायपोर्ट’चे अध्यक्ष म्हणून त्यांना केंद्रीय खात्याकडून नियुक्ती मिळाली. सोबतच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेही विश्वासू, अशी ओळख असलेले आमदार कुणावार यांच्यासाठी निश्चितच रदबदली होईल. विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्याचे सूत्र ठरल्यास कुणावार बाजी मारू शकतात. सेना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी जवळीक असणारे हिंगणघाट मतदारसंघातील हे दोन्ही संभाव्य उमेदवार आता मात्र चिंतेत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिल्या जाते. या संदर्भात बोलताना अशोक शिंदे म्हणाले की, मी हिंगणघाटमधूनच लढणार. पक्षप्रमुखांचा आदेश आहे. युतीचे जागा वाटप काय व कसे होणार, याविषयी मी भाष्य करणार नाही, पण उमेदवारी गृहीत धरून मी कामाला लागलो आहे. मी लढणारच, असा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला. आमदार कुणावार यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. सेनेच्या वाटय़ाला येणाऱ्या जिल्हय़ातील वर्धा या दुसऱ्या मतदारसंघातही भाजपचे डॉ. पंकज भोयर आमदार आहे. गेल्यावेळी सेना उमेदवार चौथ्या क्रमांकावर होता. त्यापूर्वीही सेनेला याठिकाणी फारसे बळ मिळाले नाही. त्यामुळे या जागेवर सेनेचा हट्ट चालण्याची शक्यता कमीच राहण्याची शक्यता व्यक्त होते. भाजपच्या वाटेला असणाऱ्या आर्वी व देवळी मतदारसंघात भाजपने नेहमी जोरदार मुसंडी मारली आहे. आर्वीत भाजपला एकदा संधीही मिळाली आहे. सेना इथेही दुय्यम भूमिकेतच राहिली.  या जागेवरचा दावा भाजप सोडणार नाही. देवळी हे खासदार रामदास तडस यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर भाजप उमेदवार होता. सेनेची उमेदवारी नाममात्रच राहिली. त्या आधारावर भाजप या जागेवरसुद्धा दावा न सोडण्याची शक्यताच अधिक. या पाश्र्वभूमीवर सेना नेते हिंगणघाटची जागा युतीत भाजपकडून हिसकावून घेण्याची दाट शक्यता व्यक्त होते.

गोंदिया जिल्हय़ात युती तुटण्यापूर्वी गोंदिया मतदारसंघ सेनेकडे होता. सेनेतर्फे  येथून दोनवेळा आमदार झालेले रमेश कुथे हे लोकसभा पोट निवडणुकीत भाजपमध्ये आले. याठिकाणी आता काँग्रेसचे गोपाल अग्रवाल आमदार असून त्यांना गतवेळी भाजपनेच टक्कर दिली होती. त्यामुळे या जागेवर भाजपचा प्रबळ दावा आहे. भंडारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे रामचंद्र अवथळे आमदार असून युती तुटण्यापूर्वी सेनेचे नरेंद्र भोंडेकर आमदार होते. सध्या सेनेचे जिल्हा प्रमुख असलेले भोंडेकर हे या जागेवर दावा करतात. त्यामुळे जागा वाटपात ही जागा वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता व्यक्त होते. या दोन्ही जिल्हय़ात सेना नाममात्र असून एकूण सातपैकी काँग्रेसचा वगळता सहा जागांवर भाजप आमदार आहे. चंद्रपूर जिल्हय़ात भद्रावतीत सेनेचे बाळू धानोरकर यांनी भाजपच्या संजय देवतळेंचा निसटत्या मतांनी पराभव केला होता. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या देवतळेंसाठी ही जागा खेचण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे युतीतील बेबनाव येथे प्रकट होऊ शकतो. याखेरीज चंद्रपूर राखीव मतदारसंघावर सेनेचा डोळा आहे. गडचिरोलीत सेना नावालाही नसल्याचे दिसून येते. तीनही जागांवर भाजपचे आमदार असून यापूर्वी देखील विधानसभा निवडणुकीत सेनेचा भगवा चुरगाळलेलाच राहण्याचा इतिहास आहे.

हिंगणघाटच्या जागेवरून युतीच्या समंजसपणाची पारख

पूर्व विदर्भातील काही जिल्हय़ात निम्म्या जागा खेचण्याचा सेनेकडून प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त होते, पण या परिसरातील स्वबळाची जाण सेनानेते ठेवून असल्याने अधिक जागांसाठी ते ताणून धरणार नाही, असा भाजपनेत्यांचा कयास आहे. पूर्वपेक्षा पश्चिम विदर्भात मात्र सेनानेते आग्रही राहतील. त्यासाठी पूर्व विदर्भातील काही जागांवर ते पाणी सोडू शकतात, पण गड मानल्या जाणाऱ्या जागांसाठी सेना आग्रही राहिल्यास भाजपला तडजोड क्रमप्राप्त ठरते. हिंगणघाट या एकाच जागेवरून युतीच्या समंजसपणाची पारख होईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 1:48 am

Web Title: shiv sena bjp alliance maharashtra assembly election 2019
Next Stories
1 अलिबागमधील बेकायदा बांधकामांविरोधातील कारवाई थंडावली
2 विवाहितेचा खून; पतीसह कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा
3 VIDEO: सोशल मीडियावर युद्धाच्या पोस्ट करणाऱ्यांना वीरपत्नी काय म्हणते ते बघाच
Just Now!
X