सत्ताधारी काँग्रेस आघाडीत मरगळ

येत्या फेब्रुवारीत होणाऱ्या सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजप व शिवसेना आक्रमक पवित्रा घेत संपूर्ण शक्तिनिशी तयारीला लागली असताना दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस आघाडीत अद्यापि मरगळ असल्याचे दिसून येत आहे. सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न चालवला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये तशी कोणतीही सावधानता न बाळगता केवळ पत्रकबाजीचा वापर होताना दिसून येतो.

शहरात काँग्रेसची संपूर्ण मदार एकमात्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर अवलंबून आहे. शिंदे यांनी गेल्या आठवडय़ात शहरात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांच्यासमवेत पक्षाच्या आजी-माजी नगरसेवकांसह प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यात आगामी महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याचा संदेश दिला गेला खरा, परंतु त्याच सुमारास पालकमंत्री विजय देशमुख यांनी काँग्रेसमधील १२ नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये संशयकल्लोळ दिसून येतो. मात्र पालकमंत्र्यांचा हा गौप्यस्फोट काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी गांभीर्याने न घेता उलट, पालकमंत्र्यांनीच काँग्रेसमध्ये यावे, असे विधान केल्याने तो शहरातील राजकीय वर्तुळात विनोदाचा विषय ठरला आहे.  गेल्या ४ सप्टेंबर रोजी सुशीलकुमार शिंदे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पार्क स्टेडियमवर झाला. या जंगी सत्कार सोहळय़ाचा राजकीय लाभ घेण्याची क्षमता स्थानिक काँग्रेसजनांमध्ये दिसून येत नाही, दुसरीकडे राज्यात सत्ताधारी भाजप-सेना युतीच्या विरोधात एखाद्या प्रश्नावर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याची घोषणा करूनदेखील प्रत्यक्ष त्यास मुहूर्त ठरत नाही. विशेषत: दक्षिण सोलापूरमधून प्रतिनिधित्व करणारे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल संस्थेत उघडकीस आलेल्या आक्षेपार्ह प्रकरणांच्या विरोधात स्थानिक काँग्रेसजन मौन बाळगून असल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.  भाजपने एकीकडे आक्रमक पवित्रा घेतला असताना दुसरीकडे आतापर्यंत काँग्रेसमध्ये राहिलेले व गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत दाखल झालेले माजी महापौर महेश कोठे हे आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला धडा शिकवण्याचा विडा उचलत या पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जाते. महापालिकेत काँग्रेसमध्ये सध्या कोठे यांचे पुतणे व इतर नजीकच्या नातेवाइकांसह सात नगरसेवक आहेत. शिवाय या पक्षातील इतर काही नगरसेवकही कोठे यांच्यावर निष्ठा बाळगून आहेत. येत्या महापालिका निवडणुकीत हे सर्व कोठे समर्थक काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेत किंवा सोयीप्रमाणे अन्य पक्षात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तशी कुजबुज आतापासूनच ऐकायला मिळत आहे. या पाश्र्वभूमीवर चारसदस्यीय प्रभाग पद्धतीची जाहीर केली गेलेली रचना सत्ताधारी काँग्रेसला अडचणीची ठरू शकते. त्याची चिंता पक्षाच्या नगरसेवकांमध्ये उघडपणे व्यक्त होत आहे. यात सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे राजकीय जाणकारांचे लक्ष वेधले आहे.