हर्षद कशाळकर, अलिबाग

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रायगडमध्ये विकासकामांच्या श्रेयावरून शिवसेना-भाजप यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते हे रायगडचे खासदार असले तरी त्यांना विकासकामांचे श्रेय मिळू नये, यासाठी भाजपने जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती व्हावी, यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. पण शिवसेनेकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. उलट शिवसेना नेतृत्वाकडून भाजपची सातत्याने कोंडी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे भाजपकडूनही आता शिवसेनेची कोंडी करण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात सध्या याचाच प्रत्यय पावलोपावली येत आहे.

विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या विरोधात जाऊन उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या राजीव साबळे यांचा पराभव करीत अनिकेत तटकरे निवडून आले होते. यानंतर झालेल्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपने निरंजन डावखरे यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेना एकाकी पडल्याचे दिसून आले. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे याच बालेकिल्ल्यात आता सेनेची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते हे रायगड जिल्हय़ाचे खासदार आहेत. कोकणात सुरू असलेल्या विकासकामांचे श्रेय त्यांना मिळू नये यासाठी भाजपने जोरदार मोहीम उघडली आहे. गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात कोकणात मुंबई-गोवा महामार्गाच्या इंदापूर ते झाराप रुंदीकरणाला मंजुरी दिली आणि कामही सुरू झाले. कोकण रेल्वेच्या रोहा ते वीर दरम्यानच्या दुपदरीकरणााचे काम मार्गी लावले. भाऊचा धक्का ते मांडवादरम्यान रो रो जलवाहतूक सेवेचे काम पूर्ण झाले आहे. वडखळ ते अलिबाग आणि दिघी ते माणगाव रस्त्यांची कामही आता सुरू होत आहेत.

पनवेल ते रोहा दरम्यान रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण अंतिम टप्प्यात आहे. या मार्गावर वाढीव शटल सेवा लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे. या सर्व विकास कामांचे श्रेय जिल्ह्याचे खासदार म्हणून अनंत गीते यांना जाऊ  नये यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. रायगड जिल्ह्यातील रेल्वे सेवेसंदर्भातील प्रश्नाच्या सोडवणुकीबाबत गीते सातत्याने आग्रही होते. मुंबई आणि दिल्ली येथे त्यांनी रेल्वेमंत्र्यासोबत बैठका घेऊन यावर चर्चाही घडवून आणली होती. पेण स्थानकावर किमान काही जलदगती गाडय़ांना थांबा मिळावा, अलिबाग पेण रेल्वे सेवा सुरू व्हावी, रोहा ते पनवेल दरम्यान शटलसेवा सुरू व्हावी यांसारख्या प्रश्नांसाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. हे प्रश्न मार्गी लागण्यापूर्वीच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचे शिष्टमंडळ रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना जाऊन भेटले आणि पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यातील रेल्वेसंदर्भातील प्रश्नाबाबत निवेदन दिले. यानंतर या सर्व प्रश्नांची सोडवणूक श्रेय भाजपलाच असल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करून टाकले.

अनंत गीते यांनी अलिबाग-पेण रेल्वे मार्गावर प्रवासी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. यासाठी पाहणी करून ३५० कोटी रुपयांचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने तयार केला. एमएमआरडीएकडे यासाठी अर्थसाहाय्य करण्याची विनंती केली गेली. मात्र एमएमआरडीएने त्यास असमर्थता दर्शवली. यानंतर आरसीएफ कंपनीकडून त्यांची रेल्वे लाइन प्रवासी वाहतुकीसाठी देण्यास हरकत नसल्याचे गीते यांनी कंपनी व्यवस्थापनाकडून लिहून घेतले. पण अद्यापही रेल्वे मंत्रालयाकडून यावर ठोस निर्णय कार्यवाही करण्यात आलेली नाही. आता भाजपच्या माध्यमातून ही रेल्वेसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धारप यांनी केला आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातूनच या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील घटक आणि रायगड जिल्ह्याचा खासदार म्हणून झालेल्या विकासकामांचे श्रेय अनंत गीते यांचेच आहे. ते कोणी हिरावून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. केंद्र पुरस्कृत विविध योजनांची तंतोतंत अंमलबजावणी कशी होईल यासाठी देखील प्रयत्न केला आहे. खासदार निधीच्या माध्यमातून गावागावांत कामे केली आहेत. अलिबाग-पेण रेल्वे मार्गावर सेवा सुरु व्हावी यासाठी गेली आठ वर्ष सातत्याने पाठपुरावा केला आहे. मुंबई-गोवा महामार्गासह अलिबाग वडखळ महामार्गाचे रुंदीकरणाला मंजुरी मिळवून घेतली आहे. आता या कामांचे श्रेय कोणी घेत असेल तर ते योग्य नाही असे मत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. भाजपने श्रेयवादाचे राजकारण करू नये असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला आहे.

मध्य रेल्वेच्या पनवेल ते रोहा या मार्गावरील दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. विद्युतीकरणाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. तसेच  पेणकरांची लोकल सेवेची गरजही पूर्ण होऊ  शकेल. यासंदर्भात रेल्वे मंत्री आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. आपण स्वत:च या यासेवेचे उद्घाटन करणार आहोत.

  – अनंत गीते,  केंद्रीय अवजड उद्योग मंत्री