सेना-भाजपकडून अध्यक्षपदाचे आमिष

शिवसेना-भाजपचे आमदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांपुढे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव दिल्यानंतर आता या पक्षात सन २००२ सालसारख्या महायुतीच्या प्रयोगाचा ‘गजर’ सुरू झाला आहे.

नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया तीन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना यापूर्वी आवाक्यात आलेली काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तोडण्याच्या प्रयत्नांनी उचल खाल्ली असून शिवसेनेच्या जिल्ह्यातील आमदारांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित  पवार यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षासाठी अध्यक्षपदाचा प्रस्ताव दिला.

नांदेड जि.प.मध्ये २८ जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असून त्यानंतर भाजप-१३, शिवसेना-१० आणि राष्ट्रवादी काँग्रेस-१० असे संख्याबळ आहे. या तीन काँग्रेसेतर पक्षाच्या सदस्यांची संख्या ३३ होत असून सन २००२ च्या प्रयोगाप्रमाणे ‘राष्ट्रवादी’ ला आपल्या बाजूने खेचून काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याचे प्रयत्न सेना-भाजपकडून मुंबईत सुरू झाले. शिवसेनेचे चारही आमदार भाजप पदाधिकाऱ्यांसह ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांना भेटल्यानंतर काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली.

काँग्रेससोबतच्या आघाडीत ‘राष्ट्रवादी’ला गेल्यावेळी उपाध्यक्षपदासह एक सभापतिपद मिळाले होते. तेव्हा या पक्षाचे संख्याबळ १८ होते. काँग्रेसने त्यातील दोन गटांना सोबत घेत सत्ता स्थापन केली. आता केवळ १० सदस्यसंख्येवर अध्यक्षपद चालून आल्याने ‘राष्ट्रवादी’ च्या नेत्यांनी भाजप-शिवसेनेकडून आलेल्या प्रस्तावावर विचार सुरू केल्याची माहिती मिळते.