सोलापूर महापालिका निवडणुकांसाठी सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून बहुसंख्येने आयात करून उमेदवारी बहाल करण्यात अग्रेसर ठरलेल्या भाजप व शिवसेनेंतर्गत धुसफुस वाढली आहे. निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना लाल गालिचे अंथरले जात असल्याबद्दल भाजप व सेनेत निष्ठावंतांनी संताप व्यक्त केला. यात भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांना धक्काबुक्की सहन करावी लागली. तर दुसरीकडे शिवसेनेत काही पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे देत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी आतूर झालेल्या भाजपमध्ये तीव्र संघर्ष पाहावयास मिळत असताना त्यात पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यातील संघर्षही उघड झाला आहे. एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेतील तब्बल ४० जणांना आयात करून उमेदवारी दिली असताना दुसरीकडे दहिटणे-शेळगी प्रभागातून पालकमंत्री विजय देशमुख यांचे चिरंजीव डॉ. किरण देशमुख यांना उमेदवारी देण्यावरूनही वाद उफाळून आला आहे. तर दुसरीकडे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी तीव्र विरोध केल्याने पालिकेतील विद्यमान विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे यांचा पत्ता कापण्यात आल्याने ते बिथरले आहेत. मूळचे बजरंग दलाचे असलेले नरेंद्र काळे यांनी ‘बजरंगी रंग’ दाखवत अपक्ष उमेदवारी पुढे आणताना भाजपला आव्हान दिले आहे. प्रभाग क्र. २४ मधून पक्षाने काळे यांना डावलून अश्विनी चव्हाण या महिलेला पुढे आणले आहे. दोन्ही देशमुखांच्या शह-प्रतिशहच्या राजकारणात नरेंद्र काळे यांचा बळी गेल्याचे मानले जात आहे. अश्विनी चव्हाण यांना माघार घ्यायला लावण्यासाठीही दबाव आणून पुन्हा काळे यांना संधी देण्याचा घाट विजय देशमुख हे घालत आहेत.

शेळगी व दहिटणे भागातून भाजपने उमेदवारी देताना अन्याय केल्याचा राग मनात धरून एका संतप्त कार्यकर्त्यांने पक्षाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांच्या श्रीमुखात लगावल्याचा प्रकारही घडला. मुरारजीपेठेतील हॉटेल ऐश्वर्यामधून पक्षाच्या इतर नेतेमंडळींसह प्रा. निंबर्गी हे बाहेर पडत असताना एका संतप्त कार्यकर्त्यांने त्यांच्याशी वाद घालत व शिव्यांची लाखोली वाहत त्यांच्या श्रीमुखात लगावली. हा प्रकार अनेकांनी पाहिला.

दुसरीकडे शिवसेनेतही निष्ठावंतांना डावलण्यात आल्याबद्दल धुसफुस वाढली आहे. शिवसेना जिल्हा महिला आघाडीप्रमुख अस्मिता गायकवाड यांनी उमेदवारी डावलल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले. काँग्रेसमधून अलीकडेच शिवसेनेत आलेले जिल्हाप्रमुख महेश कोठे हे शिवसेना संपवायला निघाले आहेत, असा आरोप गायकवाड यांनी केला. आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे विभागप्रमुख लहू गायकवाड व दत्ता गणेशकर यांनीही पदाचे राजीनामे देण्याचे जाहीर केले आहे.