शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास जमीन हस्तांतरित करण्यासाठी १४ कोटी ४१ लाख ६१ हजार ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणार आहे. स्मारक उभारण्यासाठी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संस्था स्थापन करण्यात आली आहे. सरकारने स्मारकासाठी महापौर बंगल्याच्या जागेचे ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने हस्तांतरण केले आहे. त्यासाठी सुमारे १४ कोटी ४२ लाख रुपयांचे मुद्रांक आणि नोंदणी शुल्क भरावे लागणार होते. ते आता माफ करण्यात आले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले होते. शिवसेनेच्या पाठिंब्यावर भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यावर १७ नोव्हेंबर २०१५ रोजी तृतीय पुण्यतिथीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची घोषणा केली होती. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ट्रस्ट स्थापन करून वर्षभरात महापौर बंगल्यातील स्मारकाचे काम पूर्ण होईल, असेही जाहीर केले होते. मात्र महापौर बंगल्याचे हस्तांतरण रखडले होते. अखेर आता हस्त्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून महापौरांनाही भायखळा येथील जिजामाता उद्यानात पर्यायी निवासस्थान दिले जाणार आहे.