कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला होत आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनातही मराठी भाषेचं संवर्धनाविषयी चर्चा झाली. मराठी विरूद्ध इंग्रजी असा भाषिक वादही सातत्यानं ऐकायला मिळतो. मराठी आणि इंग्रजी या भाषिक वादावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोलाचा उपदेश दिला होता.

किस्सा आहे मार्च २००० सालचा. षणमुखानंद सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा होता. या सोहळ्याला भाजपाचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बाळासाहेबांना भाषेविषयी मौलिक मूलमंत्र दिला. बाळासाहेब म्हणाले,”तुम्ही उत्तम इग्रंजी बोला. आता एक विद्यार्थिनी इंग्रजी छान बोलली. त्याचबरोबर मातृभाषाही तुम्हाला विसरता येणार नाही. खरं सांगायचं तर अत्यंत गरजेच आहे. इग्रंजी बोलाच, पण मराठीही शिका. जितक्या भाषा शिकता येतील तितक्या शिका. इंग्रजीचा द्वेष करून चालणार नाही. इंग्रज गेले पण, इंग्रजी राहिली पाहिजे. इंग्रजी आलीच पाहिजे. आपल्या पोरांनी जो मार खाल्ला तो इंग्रजी येत नसल्यामुळे,” असंही बाळासाहेबांनी यावेळी सांगितलं.

प्रत्येक भाषेतील शिव्या शिकून घ्या-

बाळासाहेब म्हणाले,”जुनी गोष्ट आहे. एका पोराला विचारला what is your Father name? ते म्हणालं,’माझा बाप काढू नको तुला सांगतो. कानाखाली आवाज काढेल.’ त्याला काय वाटलं बापाविषयीचं काहीतरी वाईट उद्गार काढले. म्हणून ते म्हणालं कानाखाली आवाज काढेल. एव्हढं तरी.. मी फ्री प्रेसमध्ये असताना पहिलं कामं केलं की, तामिळ शिव्या शिकून घेतल्या. दिली तर कळलं पाहिजे. शिवी दिल्यानंतर थँक्यू व्हेरी मच करण्यात काय अर्थ आहे का? त्यामुळे प्रत्येक भाषेतील शिव्या शिका,” बाळासाहेबांनी असा सल्ला देताच उपस्थित विद्यार्थ्यांमधून हास्याचे कारंजे उडाले.

आणखी वाचा – मराठी भाषेचा दुर्लक्षित वारसा; आक्षीचा आद्य शिलालेख नामशेष होण्याच्या मार्गावर

इथं पहिल हिंदी आमचं-

“जर्मनीमध्ये जर्मन भाषेला खुप महत्त्व आहे. तिथं गेलं की, जर्मनमध्येच बोलाव लागतं. स्विझर्लंडचंही तसंच. नाहीतर आपल्याकडं दूधवाला भैय्या आला तरी पहिल हिंदी आमचं. आणि हिंदी पण काय? आज दूध में पाणी जास्त लगता है?,” असं सांगत बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मराठी भाषेविषयीच्या भूमिकेलाही टोला लगावला होता.