भाजपा- शिवसेना युती कायम राहावी यासाठी अमित शहा यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली असतानाच शिवसेनेने या बैठकीत भाजपाला जागावाटपासाठीचा फॉर्म्यूला सांगितल्याचे समजते. शिवसेनेने विधानसभेतील २८८ पैकी १५२ जागा आणि मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे द्यावे, असा प्रस्ताव दिल्याचे समजते. आता शिवसेनेच्या या प्रस्तावावर भाजपा राजी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार अमित शहा- उद्धव ठाकरे भेटीत शिवसेना नेतृत्वाने अमित शहांसमोर जागावाटपासाठीचा प्रस्ताव मांडला. यात लोकसभा निवडणुकीत भाजपास ‘मोठ्या भावा’चा मान देण्याची तयारी शिवसेनेने दर्शवली. मात्र, राज्यातील विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी १५२ जागा आणि मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावी, असा हा प्रस्ताव होता. या प्रस्तावावर अमित शाह यांनी ठोस आश्वासन देणे टाळले. याबाबत पुढील बैठकीत चर्चा करु असे सांगत अमित शहा तिथून निघून गेले, असे वृत्तात म्हटले आहे.

शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाला २०१४ मध्ये जेवढ्या जागा दिल्या तेवढ्याच जागा आगामी लोकसभा निवडणुकीत देण्याची शिवसेना नेतृत्वाची तयारी आहे. लोकसभा निवडणूक भाजपासोबत लढवण्यास पक्षनेतृत्व तयार आहे. पण विधानसभा निवडणुकीत पक्षाला जास्त जागा आणि मुख्यमंत्रीपद द्यावे, अशी पक्षनेतृत्वाची भूमिका आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या प्रस्तावावर भाजपाची भूमिका महत्त्वाची ठरेल. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत दिल्लीत पुन्हा भाजपाची सत्ता आली तर राज्यातील मतदार विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या बाजूने झुकतील आणि याचा फटका शिवसेनेला बसेल, अशी भीती शिवसेनेतील एका गटाला वाटते.

भाजपा शिवसेनेला १३० पेक्षा जास्त जागा देणार नाही, अशी शक्यता आहे. अमित शहा यांनी राज्यातील नेत्यांना शिवसेनेसोबत युती झाली नाही तर स्वबळावर लढण्यास तयार राहा, अशा सुचना दिल्याचे समजते.

२०१४ मधील परिस्थिती काय होती?
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी २६ जागा भाजपाने तर २२ जागा शिवसेनेने लढवल्या होत्या. पण ऑक्टोबर २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत युती तुटली. शिवसेनेने २८२ जागा लढवल्या. पण त्यांना फक्त ६२ जागांवरच विजय मिळवता आला. तर भाजपाने २६० जागा लढवून त्यापैकी १२२ जागांवर विजय मिळवला होता.