शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. शेतकरी संवाद दौऱ्यातून ते मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. दरम्यान गुरुवारी ते परभणी शहरात कार्यक्रमासाठी जात असताना काही शेतकऱ्यांनी त्यांना हातवारे करुन थांबवले. उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा शहराकडे रवाना होत असताना एमआयडीसी परिसरात तूर खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांनी या गाड्यांना हात दाखवला. यावेळी शेतकऱ्यांची गर्दी पाहून उद्धव ठाकरे यांनी गाडी थांबवून शेतकऱ्यांची चौकशी केली.

सरकारने तूर खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यांसदर्भात शेतकऱ्यांनी निवेदन देखील दिले. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत निवदेन स्वीकारले. तसेच लवकरच यासंदर्भात तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. तूर खरेदीच्या समस्येमुळे मराठवाड्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे. जवळपास लाखो क्विंटल तूर पडून आहे. औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तूर खरेदी करणे बाकी आहे. पाऊस पडत असल्यामुळे तूर भिजण्याची भितीने शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी भर पडत आहे.

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारसोबत असताना शेतकऱ्यांसाठी शिवसेनेने आक्रमकता दाखवली होती. राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर शिवसेनेने पोस्टरबाजी करुन श्रेयवाद घेतल्याचे देखील पाहायला मिळाले. त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीर असल्याचे दाखवून देण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. या दौऱ्यात शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून त्यांना येणाऱ्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना पुन्हा मित्र पक्ष असणाऱ्या भाजपवर तोफ डागणार की मित्रत्वाच्या नात्याने सरकारला शेतकऱ्यांची तूर खरेदी करायला भाग पाडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.