उद्धव ठाकरे यांचा प्रशिक्षण शिबिरात इशारा
युती होणार का नाही, यात वेळ वाया गेला. पण, हरकत नाही. येत्या निवडणुकीत विधानसभेवर शिवसेनेचा भगवाच फडकेल असा ठाम विश्वास व्यक्त करताना, विधानसभेच्या निवडणुकीत थोडा वेळ मिळाला असता, तर तुमच्या बरोबर नव्हेतर तुमच्याही पुढे गेलो असतो, असे मित्रपक्ष भाजपला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निक्षून सांगितले.
तीन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते सोळशी (ता. कोरेगाव) येथे बोलत होते. साताऱ्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री विजय शिवतारे, डॉ. नीलमताई गोरे, डॉ. अमोल कोल्हे, शशिकांत सुतार यांच्यासह सेनानेत्यांची तसेच शिवसैनिकांची मोठी उपस्थिती होती. उद्धव ठाकरे यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजपाचा समाचार घेतला. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. परिपूर्ण शहरांना स्मार्ट काय करता? सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या शहरांना स्मार्ट करण्याचा नेमका उद्देश काय? असे सवाल करून, युती असो वा नसो पुणे, मुंबई महापालिकेसाठी येईल त्याला सोबत घेऊ अन्यथा स्वतंत्रच लढणार असल्याचे ठाकरे म्हणाले. पुणे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा न फडकल्याची खंत व्यक्त करताना, पुणे असो वा मुंबई महापालिकांवर शिवसेनेचाच भगवा फडकेल. किती इंचाची छाती याला महत्त्व नाही, माझा शिवसैनिक हा अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारा आणि निधडय़ा छातीचा हवा असल्याचे आवाहन त्यांनी केले.
विजय शिवतारे म्हणाले, की भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने माण, खटावमधील महत्त्वाकांक्षी जिहे-कटापूर या पाणी योजनेच्या कामाला गती मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत थोडक्या मतात पराभव झालेले रणजितसिंह देशमुख हे येत्या विधानसभा निवडणुकीत माण, खटावमध्ये निश्चित शिवसेनेचा भगवा फडकवतील.
प्रास्ताविक माजी आमदार विनायक निम्हण यांनी केले. शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, माथाडीसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष सोळस्कर, बाळासाहेब फाळके यांचे उपस्थिती होती.