News Flash

विदर्भात पावसाळी अधिवेशन; भाजपची मागणी उद्धव ठाकरे यांनी फेटाळली

पावसाळी अधिवेशन विदर्भात घेण्याची गरज भासणार नाही.

(संग्रहित छायाचित्र)

औरंगाबाद :  विदर्भामध्ये पावसाळी अधिवेशन घेण्याच्या भाजपच्या नेत्यांनी केलेल्या आग्रही मागणीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कडाडून विरोध केला. अधिवेशन न घेताही विदर्भाचे प्रश्न सोडविण्यासाठी अंमलबजावणीत येण्यासारख्या योजना या प्रदेशाला दिल्या तर अधिवेशने आणि बैठकांची आवश्यकता भासणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पावसाळी अधिवेशन मुंबईतच व्हावे, असे म्हटले आहे. औरंगाबाद येथे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षबांधणी आणि मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

शिवसेनेची ही बैठक स्वबळाची आखणी आहे का, असे विचारताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, की असे तुम्हाला कोण म्हणाले? याचा अर्थ युती होईल, असा प्रतिप्रश्न त्यांना केला असता ते म्हणाले, युती करायची नाही, असा निर्णय आम्ही यापूर्वीच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या युतीबाबतच्या वक्तव्यातून पुन्हा एकदा ‘तळय़ात-मळय़ात’ असाच अर्थ ध्वनित होत होता.

डिसेंबरमध्ये लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्रित घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा विचार माध्यमांमधून ऐकत होतो. त्यामुळे माझ्या पक्षाची बांधणी करण्यासाठी म्हणून मराठवाडय़ात ही बैठक घेतली.

राज्यातील अन्य भागातही अशाच प्रकारच्या बैठका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाळी अधिवेशन विदर्भात घेण्यापेक्षा मुंबईत होणाऱ्या या अधिवेशनात विदर्भासाठी अंमलबजावणीत येतील अशा योजना आखल्या जाव्यात. अनेक निर्णय घेताना अधिवेशनाची गरज भासत नाही. असे निर्णय घेतले तर पावसाळी अधिवेशन विदर्भात घेण्याची गरज भासणार नाही.

विदर्भाला ५० हजार कोटी रुपये देतो, असे नुसतेच जाहीर करायचे आणि रक्कमच द्यायची नाही. असे करू नका. मराठवाडय़ासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी होत आहे. गेल्या वर्षी ही बैठक झाली नव्हती असे लक्षात आणून दिल्यानंतर या अनुषंगाने आपण सरकारशी बोलू, असेही ते म्हणाले.

विदर्भातील लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या जमिनी निर्बंधमुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत घेतलेला निर्णय अभिनंदनास पात्र असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, असाच निर्णय राज्यातील अन्य जमिनींच्या बाबतही घेतला जावा, अशी मागणी मी करत आहे, असेही ते म्हणाले.

तशी कोणती तक्रार नाही!

कन्नड मतदारसंघातील अनेकांशी संपर्क केल्यानंतर मतदारांना शिवसेनेला मतदान करायचे आहे, पण त्यांना उमेदवार म्हणून चंद्रकांत खैरे नको आहेत, अशी भावना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत लेखी स्वरूपात आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली होती. आज लोकसभा मतदारसंघाचा आढावा चालू असताना उपस्थित असलेल्या जाधव यांनी पत्रकारांसमोर पुन्हा एकदा हीच भूमिका मांडली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठकीत आपल्यासमोर हा विषय आलाच नाही, असे म्हटले. तशी कोणतीही तक्रार नाही, असे ते म्हणाले. पालकमंत्री रामदास कदम यांना औरंगाबादमधून हलविण्याचा निर्णय खैरे आणि कदम यांच्या वादाच्या पाश्र्वभूमीवर नाही, तर पक्षाला गरज असल्याने कदम यांच्याकडे वेगळी जबाबदारी दिली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

एक खासदार गैरहजर, एक आमदार भाजप नेत्यांच्या तैनातीत

लोकसभा मतदारसंघाचा आढावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याचे समजल्यानंतर उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड हे बैठकीस आले नाहीत. ते कोणत्या तरी केंद्रीय समितीबरोबर दौऱ्यावर असल्याचे उस्मानाबादच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. एका बाजूला एक खासदार गैरहजर होते, तर दुसरीकडे शिवसेनेचे लोहा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर भाजप नेत्यांच्या तैनातीत होते. या मतदारसंघात आज राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम आखण्यात आले होते. गुरुवारी सकाळी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयाचे त्यांनी उद्घाटन केले. या वेळी आमदार शिरसाट हे कट्टर शिवसैनिक आहेत, असेही त्यांना भाषणात सांगावे लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 2:48 am

Web Title: shiv sena chief uddhav thackeray rejects bjp demand over monsoon season in vidarbha
Next Stories
1 ‘कचरानगरीत’ निवडणुकीसाठी बांधणी
2 जोरदार पावसाने गारवा, पण शेतकऱ्यांच्या मनात धडकी!
3 तेरा शाळांमध्ये ३२ लाखांचा अपहार
Just Now!
X