अहमदनगर महापालिकेत तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवूनही राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपाचा महापौर झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी-भाजपा युतीबाबत शरद पवारांना माहीत होते की नाही हे त्यांनाच माहीत पण नगरमधील ही लोकशाही उद्या बेबंदशाही होऊ शकते. २०१४ साली याच राष्ट्रवादीने भाजपाला सरकार स्थापण्यासाठी असाच बिनशर्त पाठिंबा देऊ केला होता. भाजपा व राष्ट्रवादीचे हे लफडे जुनेच आहे. आमचे कोणतेही अनैतिक संबंध नाहीत असे ते उगाच सांगत असतात. विधानसभा निवडणुकीनंतर बिनशर्त पाठिंबा जाहीर करून राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्यातील त्यांच्या पुढार्‍यांना कवचकुंडले मिळवली व आता नगर महापालिकेत पाठिंबा देऊन केडगाव खून प्रकरणातील स्वतःच्या आमदारांना साफ करून घेतले, असा गंभीर आरोप ठाकरे यांनी केला आहे.

सर्वाधिक जागा मिळूनही नगर महापालिकेत सत्ता स्थापन न करता आल्याने शिवसेनेमध्ये संतापाचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे यांनी याच पार्श्वभूमीवर ‘सामना’ या मुखपत्रातून भाजपा-राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे..
* शिवसेनेचा महापौर होऊ देणे हा कौल होता. एका बाजूला शिवसेना हाच भाजपचा नैसर्गिक मित्र असल्याचे म्हणायचे. दोघांची विचारधारा हिंदुत्ववादी आहे, त्यामुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होता कामा नये. व दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादीशी अनैसर्गिक, अनैतिक संबंध ठेवून सत्ताभोग घ्यायचा. खरी युती हिंदुत्ववादाशी नसून भ्रष्टवादाशी आहे.

* भाजपा खासदारांचे पुत्रही त्यांच्या घरच्या मैदानात शिवसेनेकडून पराभूत झाले. नगरचे चित्र असे आहे की, सासरा भाजपात, तर जावई राष्ट्रवादीत, हे दोघे एकत्र आले.

* या निवडणुकीत काँग्रेस पक्षही तटस्थ राहिला म्हणे. राधाकृष्ण विखे-पाटलांचा हा जिल्हा; पण त्यांचेही आतून कीर्तन वरून तमाशा असेच सुरू असते. राष्ट्रवादीच्या पायात त्यांचीही टांग आहेच. भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचा हा नवा ‘नगर पॅटर्न’ कुठपर्यंत जातोय ते पाहायचे.

* महाराष्ट्रातील विद्यमान सरकारचा जन्मच मुळात राष्ट्रवादीसोबतच्या ‘अनैतिक’ संबंधातून झाला आहे. नगरमध्ये ते पुन्हा उफाळून आले आणि भाजपला तेथे महापौर-उपमहापौरपदाची प्राप्ती झाली.