८० वर्षांचे होऊनही शरद पवार यांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय. खऱ्या अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या, मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या, सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या, हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो, अशा शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. ‘ठाकरे सरकार’ ही शरद पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज असल्याचंही शिवसेनेनं म्हटलं होतं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील शरद पवार यांच्यासह फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. सर्वच स्तरातून आज शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

“महाविकास आघाडीचे आधारस्तंभ शरद पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांची ऊर्जा, उत्साह आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

रोहित पवारांकडूनही शुभेच्छा

“महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड”, अशा शब्दांत रोहित पवारांनी शरद पवारांचं वर्णन केलं. “महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड! आदरणीय पवार साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शतायुषी व्हा आणि माझ्यासारख्या युवांना आणि नव्या पिढीला कायम मार्गदर्शन करत रहा,” असं ट्विट रोहित पवारांनी केलंय.