08 July 2020

News Flash

शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून वर्चस्वाचा दावा; भाजपचा पराभव

जिल्ह्यातील ३७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर गुरुवारी जाहीर झालेल्या निकालावरून बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेनेने सत्ता मिळवून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गजांना भुईसपाट केल्याचा दावा केला.

| August 7, 2015 01:20 am

जिल्ह्यातील ३७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर गुरुवारी जाहीर झालेल्या निकालावरून बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेनेने सत्ता मिळवून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गजांना भुईसपाट केल्याचा दावा केला. देशात व राज्यात बोलबाला असलेल्या भाजपचा ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र पुरता धुव्वा उडाला. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असल्याचा दावा केला जात आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या ५७० जागांसाठी १ हजार २११ उमेदवार मैदानात होते. ३० ग्रामपंचायतींवर भगवा फडकावल्याचा दावा सेनेने केला. वडगाव सि. येथे सेनेच्या पॅनेलने सर्व ११ जागा जिंकत राष्ट्रवादी पॅनेलला पराभवाची धूळ चारली. वरवंठी ग्रामपंचायतीतही सेनेचे सर्व उमेदवार विजयी झाले. वडगाव सि., वरवंठी, भानगाव, अनुसुर्डा, कौडगाव, जहागिरदारवाडी, खामगाव, धुत्ता, सांजा, गोवर्धनवाडी, पळसप, नितळी, गडदेवाडी, मेडसिंगा, विठ्ठलवाडी, सकनेवाडी, आंबेवाडी, काजळा, िपपरी, टाकळी ढोकी, आळणी, भंडारवाडी, िहगळजवाडी, मुळेवाडी, भंडारी, गौडगाव बावी तसेच कावलदारा या ग्रामपंचायतवर सेनेने वर्चस्व प्रस्थापित केले.
वाशी तालुक्यात ३३ ग्रामपंचायतींमध्ये ५९५ उमेदवारांनी नशीब आजमावून पाहिले. तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादीला निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. बहुतांश ठिकाणी शिवसेनेचे पॅनेल निवडून आले. कळंब तालुक्यात ५३ ग्रामपंचायतींमध्ये १ हजार ७३ उमेदवार िरगणात होते. राष्ट्रवादी व शिवसेना अशी अप्रत्यक्ष दुरंगी लढत झाली. गावपातळीवर पक्षाचा उमेदवार दिसतो. परंतु अन्य पक्षाचे उमेदवार एकत्र येऊन स्थापन केलेल्या पॅनेलमधूनही राष्ट्रवादीचेच अधिक उमेदवार निवडून आल्याचा दावा या पक्षाकडून केला जात आहे.
तुळजापूर तालुक्यात ५१ ग्रामपंचायतींसाठी ९२१ उमेदवार मैदानात होते. महत्त्वाच्या जळकोट ग्रामपंचायतीवर गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या सेनेने याही वेळी विरोधकांना धूळ चारत ग्रामपंचायत पुन्हा आपल्या ताब्यात ठेवली. काँग्रेसचे आमदार मधुकर चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत उतरून काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवले. तुळजापूर तालुक्यात काँगेसचे वर्चस्व आहे.
परंडा तालुक्यात माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यामुळे शिवसेना अस्तित्व टिकवून आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी व शिवसेना अशी अप्रत्यक्ष लढत झाली. ६१ ग्रामपंचायतींसाठी ९३२ उमेदवार िरगणात होते. यातील ग्रामपंचायतींच्या जागा सोडल्या, तर अनेक हौशी उमेदवारांची अनामत जप्त झाली.
उमरगा तालुका सेनेचा बालेकिल्ला मानला जातो. तालुक्यातील सावळसूर, भिकारसांगवी, जकेकुर, कदमापूर, दुधनाळ, कदेर, तुरोरी आदी ३० ग्रामपंचायतींवर सेनेचा भगवा फडकला व सर्वाधिक जागा मिळवत काँग्रेसवर आत्मपरीक्षणाची वेळ आणली. लोहाऱ्यातही राष्ट्रवादी व सेनेला कमी-अधिक प्रमाणात जागा मिळाल्या. सर्वाधिक जागा आम्हीच जिंकल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. भूम तालुक्यात काँग्रेस व शिवसेनेची दुरंगी लढत झाली. आमदार राष्ट्रवादीचे असले, तरी ग्रामीण भागात काँग्रेस व सेनेला मानणारे मतदार आहेत, हे या निवडणुकीवरून लक्षात आले. काँग्रेस व सेनेने अनेक ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2015 1:20 am

Web Title: shiv sena congress ncp ahead in gram panchayat election
Next Stories
1 विखे पाटील साहित्य पुरस्कार जाहीर
2 गंभीर गुन्ह्य़ाचा आरोप असलेले बाबा भांड साहित्य संस्कृती महामंडळाच्या अध्यक्षपदी!
3 ‘सरोगसी’तून आई होणाऱ्या आणि मूल दत्तक घेणाऱ्या महिलांनाही मातृत्व रजा
Just Now!
X