जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपपुढे आव्हान

संतोष मासोळे, धुळे</strong>

विधानसभा निवडणुकीनंतर आता धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राज्यातील बदलत्या समीकरणाचा स्थानिक राजकारणावर प्रभाव पडू शकतो. महाभरती, विधानसभेत मिळालेला कौल यांचा विचार केल्यास जिल्ह्य़ात भाजपने आपली ताकद वाढवली आहे. त्याचा जिल्हा परिषद निवडणुकीत लाभ होतो की, नव्याने आकारास येणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी-सेना महाआघाडीसमोर त्यांचे मनसुबे उधळले जातात, हे या निवडणुकीत दिसणार आहे.

अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेवर काँग्रेस, राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने अनेक वर्षे बेरजेचे राजकारण केले. शिवाय, विरोधकांना चितपट करण्यास हे सत्तास्थान महत्त्वाचे ठरले. या सत्तेच्या आधारे काँग्रेस, राष्ट्रवादीने पंचायत समित्या, ग्रामपंचायतींमध्ये आपली पाळेमुळे घट्टपणे रुजविली. त्यास २०१४ मध्ये भाजप केंद्रासह राज्यात सत्तेवर आल्यानंतर काहीसा हादरा बसला. काही पंचायत समिती, नगरपंचायती, नगरपालिका भाजपच्या ताब्यात गेल्या. परंतु, राज्यात भाजपची सत्ता असतांनाही धुळे जिल्हा परिषद प्रशासकाच्या ताब्यात जाईपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचा भाजपने अनेकदा प्रयत्न केला. परंतु, तो यशस्वी होऊ शकला नाही. कारण, काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार अमरीशभाई पटेल, राजवर्धन कदमबांडे, डॉ. हेमंत देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी दहिते आणि सुभाष देवरे ही काँग्रेस, राष्ट्रवादीची मातब्बर मंडळी भाजपला टक्कर देत होती.

विधानसभा निवडणुकीप्रसंगी काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये गेले. त्यात आमदार अमरीश पटेल, राजवर्धन कदमबांडे, शिवाजी दहिते, सुभाष देवरे, मनोहर भदाणे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. दिग्गज नेते भाजपमध्ये गेल्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी चुरस राहणार आहे.

विधानसभा निकालानंतर भाजप-सेना दुरावली. राज्यात सेना आणि काँग्रेस आघाडी असे नवे समीकरण आकारास येत आहे. त्याचा स्थानिक राजकारणावर परिणाम होऊ शकतो. हे तिन्ही पक्ष जिल्हा परिषद निवडणूक आघाडी करून लढणार की स्वतंत्रपणे, हे कोडे उलगडलेले नाही. धुळे ग्रामीण, शिंदखेडा, शिरपूर आणि साक्री मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे.

शिवाय, साक्रीतून विजयी झालेल्या अपक्ष उमेदवार मंजुळा गावीत यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने त्याचा लाभ सेनेला होऊ शकतो. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार स्पर्धेत होते. जिल्ह्य़ात पाच मतदारसंघांपैकी धुळे शहरात एमआयएमचे डॉ. फारुक शहा, धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचे कुणाल पाटील, साक्रीत सेनेचे समर्थन करणाऱ्या मंजुळा गावीत, शिंदखेडामध्ये भाजपचे माजी मंत्री जयकुमार रावल आणि शिरपूर मतदारसंघात भाजपवासी झालेले काशीराम पावरा विजयी झाले. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आपला खुंटा अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार, परंतु महाआघाडी झाल्यास त्यांना मोठे आव्हान मिळणार आहे.

सध्याचे राजकीय चित्र

धुळे जिल्हा परिषद- एकूण ५६ गट

काँग्रेस ३०

भाजप १३

राष्ट्रवादी ७

शिवसेना       २

इतर    ४