‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तकावर भाजपानं भूमिका मांडल्यानंतर हा वाद शमला आहे. मात्र, शिवसेनेनं भाजपानं लेखकाविषयी घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. “जाणूनबुजून करणाऱ्या फुटकळ लेखकाला भाजपातून एव्हाना हाकलून का दिले नाही? या ठिकाणी तुमचे ते व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आडवे येते, पण जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अशा स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांची डोकी फोडली जातात व त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

शिवसेनेनं पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादावरून भाजपाचा सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेतला आहे. “महाराष्ट्रात एका पुस्तकावरून वाद पेटला आहे. त्या पुस्तकाशी भारतीय जनता पक्षाचा संबंध असल्याने वादात राजकारण घुसले, पण हे वादग्रस्त पुस्तक मागे घेतल्याचे भाजपने जाहीर केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान मोदी यांची तुलना करणाऱ्या पुस्तकाशी भाजपचा संबंध नाही, असे शेवटी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना जाहीर करावे लागले. अर्थात प्रश्न असा आहे की, भाजप म्हणते, लेखक गोयल याने पुस्तक मागे घेतले, पण हा उपटसुंभ गोयल म्हणतोय, ‘छे, छे. मी पुस्तक मागे घेतले नाही, घेणार नाही.’ आता नव्याने लेखक म्हणतो, मी पुस्तकाचे पुनर्लेखन करणार. म्हणजे गोंधळ सुरूच आहे. गोयल याला जे ओळखतात ते ठामपणे सांगू शकतात की, हा माणूस खोटय़ा प्रसिद्धीचा भुकेला आहे व यानिमित्ताने त्याला ती प्रसिद्धी मिळाली आहे. आणखी काही काळ त्याला ही प्रसिद्धी मिळू शकेल. गृहमंत्री अमित शहा यांनी आता असे जाहीर केले की, ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. अशा घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात पाठवू.’ अशा वक्तव्यांमुळेही लोकांच्या भडकलेल्या भावना आणखी पेटत असतात. बरं, असे जर असेल तर भाजप कार्यालयात ‘नरेंद्र मोदी हेच शिवाजी’ असे सांगणाऱ्या लेखकावर त्याच कायद्याने कारवाई का झाली नाही? कारण याच प्रकरणामुळे राज्यातले वातावरण पेटले आहे. ते प्रकरण भीमा-कोरेगाव दंगलीसारखे होऊ नये इतकीच आमची अपेक्षा आहे,” असा इशारा शिवसेनेनं दिला आहे.

…तर अवस्था बिकट झाली असती –

“पुस्तकामुळे भडका उडाला व लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला. हे सर्व जाणूनबुजून करणाऱ्या फुटकळ लेखकाला भाजपातून एव्हाना हाकलून का दिले नाही? या ठिकाणी तुमचे ते व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आडवे येते, पण जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अशा स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांची डोकी फोडली जातात व त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. कानपूरला फैज अहमद फैज यांच्या एका कवितेवरून भाजप समर्थकांनी वाद पेटवला आहे, पण ‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ हा वादाचा विषय आहे असे कुणाला वाटत नाही. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी लाजत मुरडत निषेध केला. तसा त्यांनी तो केला नसता तर त्यांची अवस्था बिकट झाली असती. त्यातल्या त्यात त्यांनी खेळ करण्याचा प्रयत्न केलाच,” असा टोला शिवसेनेनं भाजपाला लगावला आहे.