मोदी सरकारकडून नोटाबंदी करण्यामागे दहशतवाद मोडून काढण्याचे कारण दिले गेले होते. मग पीडीपीशी काडीमोड करताना भाजपा त्याच दहशतवादाच्या नावाने बोटे का मोडत आहे, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद, हल्ले आणि पाकिस्तानची घुसखोरी वाढत असून ते सर्व रोखणे कठीण झाले होते. याचे खापर मेहबुबा मुफ्ती यांच्यावर फोडून भाजपाने गाशा गुंडाळला. इंग्रजांनीही याच पद्धतीने देश सोडला होता, असे सांगत शिवसेनेने भाजपाची तुलना थेट इंग्रजांशी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी भाजपाने काश्मीरमध्ये पीडीपीसोबतची युती तोडली होती. गुरुवारी सामनाच्या अग्रलेखातून काश्मीरमधील राजकीय नाट्यावर भाष्य करण्यात आले. काश्मीरमध्ये अराजक निर्माण करुन भाजपाने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काश्मीरमध्ये भारतीय जवान इतक्या मोठ्या प्रमाणात कधीच शहीद झाले नव्हते. हा भयंकर प्रकार भाजपाच्या राजवटीत झाला. पण याचे खापर मेहबुबा मुफ्तींवर फोडून भाजपा सत्तेतून बाहेर पडला, असे अग्रलेखात म्हटले आहे.

काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तींसोबत सत्ता स्थापन करणे हा मूर्खपणाचा आणि फाजील साहसाचाच निर्णय होता. पण देशातील एक राज्य आम्ही मिळवत आहोत. आम्ही अजिंक्य व अपराजित आहोत, आमचे उधळलेले घोडे सारा देश पादाक्रांत करतील या हावरेपणातून भाजपाने काश्मीरात पीडीपीबरोबर सत्ता स्थापन केली, अशी बोचरी टीका शिवसेनेने केली. याची किंमत काश्मीरमधील जनतेला आणि सैनिकांना चुकवावी लागली. यासाठी इतिहास भाजपाला माफ करणार नाही, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

मोदींनी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी ५६ इंचाच्या छातीची भाषा केल्याने जनतेने त्यांना मतदान केले. शिवसेनेने देखील मोदींच्या त्या आरोळ्यांचे स्वागत केले. पण प्रत्यक्षात निरपराध जनतेच्या किंकाळ्यांनी काश्मीर खोरे थरारले. या पेक्षा काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या राजवटी बऱ्या होत्या असे सांगण्याची वेळ काश्मीरमधील जनतेवर आली, असे अग्रलेखात म्हटले आहे.

राज्य करणे म्हणजे पोरखेळ नाही. पण भाजपाकडून सध्या पोरखेळ सुरु आहे. अमेरिकेतील सीआयए बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेला धर्मांध संघटना सांगत आहे आणि देशातील हिंदुत्ववादी राज्यकर्ते त्याचा धिक्कारही करत नाही, असे शिवसेनेने नमूद केले. काश्मिरी पंडितांच्या घर वापसीच्या वल्गना? २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी घटनेचे ३७० कलम रद्द करण्यासंदर्भात दिलेल्या आश्वासनाचे काय झाले ?, असा सवालही शिवसेनेने विचारला.