News Flash

“अजित पवारांचा पापडही भाजता आला नाही; शेठ काय हे!”

राष्ट्रवादीला दिलेल्या 'ऑफर'वरून शिवसेनेनं काढले चिमटे

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक नाट्यमय, तर काही आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडल्या आणि अखेर नव्यानं उद्यास आलेल्या महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाले. त्यानंतर यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला. याच ‘ऑफर’च्या संदर्भाने शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. “पवारांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखतोच आहे. या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही. शेठ, काय हे! हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल,” असा सल्ला देत शिवसेनेनं भाजपाला चिमटे काढले आहेत.

शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून राज्यात सत्तास्थापनेच्या काळात झालेल्या घडामोडींवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांना खडेबोल सुनावले आहेत. “निवडणूक प्रचारात अमित शहा यांचे सांगणे होते की , ‘ पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले ?’ याचे उत्तर पवारांनी नंतर योग्य शब्दात दिले. जर पवारांनी काय केले ही शंका अमित शहा वगैरेंना असेल, तर मग कोणत्या अनुभवाचा फायदा मोदी यांना अपेक्षित होता? पवारांचा अनुभव आहेच, पण तो देशासाठी कामी यावा यासाठी मोदी – शहा यांना साडेपाच वर्षे का लागावीत? हा प्रश्नच आहे. महाराष्ट्रात शिवरायांच्या विचारांचे राज्य येऊ नये हे त्यांचे ध्येय होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही हा त्यांचा ‘कावा’ होता. पवारांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखतोच आहे. या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही. शेठ, काय हे! हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल,” असा सल्ला वजा इशारा शिवसेनेनं भाजपाला दिला आहे.

५४ आमदार निवडून आल्यावर अनुभवाचा साक्षात्कार झाला हे नवल!

“महाराष्ट्राचे राजकारण उत्तर ध्रुवावरून दक्षिण ध्रुवावर पोहोचले आहे, पण या प्रवासात भारतीय जनता पक्षाचे जे हसे झाले आहे त्याच्या रंजक कहाण्या आता बाहेर पडू लागल्या आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये किंवा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ नये यासाठी पडद्यामागे जे भव्य नेपथ्य आणि दिग्दर्शन सुरू होते ते नाटय़ शरद पवार यांनीच समोर आणले आहे. शरद पवार यांनी या निमित्ताने काही स्फोट केले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी पवारांना ‘ऑफर’ दिली होती की, महाराष्ट्राचे सरकार भाजपबरोबर बनवा. आपल्याला आनंद होईल, पंतप्रधानांची भूमिका अशी होती की, आपण दोघे एकत्र येऊन काही तरी घडवू. तुमच्या अनुभवाचा फायदा देशाला हवाच आहे. हा अनुभवाचा फायदा घेण्यासाठी महाराष्ट्रात एकत्र सरकार व केंद्रात मंत्रीपदे अशी जंगी ऑफर होती. पण श्री. पवार यांनी ती धुडकावून लावली. याचा स्पष्ट अर्थ असा की, काही झाले तरी शिवसेनेबरोबर नाते तोडायचे. ते हिंदुत्व वगैरे जे काय आता बोलले जाते ते कुचकामाचे. शिवसेनेला वाकवायचे, वाकले नाही तर दूर ढकलायचे हे धोरण आधीच ठरले होते. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायचा होताच व ते ‘नाटय़’ तयारच होते. त्यासाठी शरद पवारांच्या अनुभवाचा फायदा देशाला करून घेणाऱ्यांना ही उपरती आधी का झाली नाही? हा सुद्धा प्रश्न आहेच. श्री. पवार यांच्या पक्षाचे ५४ आमदार निवडून आल्यावर पवारांच्या अनुभवाचा साक्षात्कार झाला हे नवल!,” असा आश्चर्य व्यक्त करणारा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

दिल्लीने सवय ठेवली पाहिजे-

“साम, दाम, दंड, भेदांच्या पलीकडे काहीतरी चालले आहे व त्याचा स्फोट श्री. पवार यांनी केला तसा स्वतंत्र बाण्याचे उद्योगपती राहुल बजाज यांनी केला. तुमच्या राज्यात मोकळेपणाने बोलण्याचे, भयमुक्त जगण्याचे स्वातंत्र्य राहिले नाही, असे श्री. बजाज यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना तोंडावर सांगितले. शिवसेनेने स्वाभिमान दाखवला. श्री. पवार यांनी दबाव झुगारला. राहुल बजाज यांनी ‘भय’ व ‘झुंडी’चे शास्त्र सांगितले. ही हिमतीची कामे आपल्या महाराष्ट्रातच झाली. कारण हिमतीने जगण्याचा अनुभव जितका महाराष्ट्राला आहे तितका तो अन्य राज्यांना नसावा. मर्जीतले उद्योगपती आणि दलालांसाठी महाराष्ट्राला चरकात टाकून पिळण्याचे काम सुरू होते व हे चरकातले पिळणे पाहून दिल्लीवाले खूश होत असावेत. महाराष्ट्राचे हे ‘पिळणे’ मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी थांबवले. आता असे नवे अनुभव पुढेही येऊ लागतील व दिल्लीने त्याची सवय ठेवली पाहिजे,” असा खबरदारीचा सल्ला शिवसेनेनं पंतप्रधान मोदी, अमित शाह यांना दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 8:24 am

Web Title: shiv sena criticize prime minister narendra modi amit shah over government formation bmh 90
Next Stories
1 दूरध्वनी बंद तरीही देयके
2 रानडुकरांकडून शेतीची नासधूस
3 कांदा दीडशे रुपयांवर
Just Now!
X