ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपालच्या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण आंदोलन सुरु केले होते. मात्र हे आंदोलन आता त्यांनी मागे घेतले आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा जोर यावेळेला फारसा काही दिसून आला नाही असे म्हणत शिवसेनेने त्यांच्या या आंदोलनावर टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या अग्रलेखातून अण्णा हजारे यांच्या आंदोलनावर खोचक शब्दात ताशेरे झाडण्यात आले आहेत.

काय म्हटले आहे अग्रलेखात?

मुळात अण्णा हजारे दिल्लीत गेले कशासाठी व दिल्लीत जाऊन त्यांनी मिळवले काय? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. शेतकऱ्यांच्या व लोकपाल वगैरे इतर प्रश्नांवर अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर उपोषण सुरू केले. उपोषण बेमुदत स्वरूपाचे होते व ते फडणवीस यांच्या मध्यस्थीने सातव्या दिवशी सोडले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मध्यस्थीस यश आले असे प्रसिद्ध झाले आहे. म्हणजे नक्की काय झाले? विविध मागण्यांची पूर्तता करणारे पंतप्रधानांच्या सहीचे एक पत्र श्री. फडणवीस यांनी अण्णांना दिले व अण्णांच्या आंदोलनाची सांगता झाली. सरकारने सगळे प्रश्न तत्त्वतः मान्य केले. तत्त्वतः म्हणजे काय? हा पुन्हा प्रश्न आहेच. सहा महिन्यांत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा उपोषणाला बसेन, असे अण्णा हजारे यांनी सांगितले. रामलीला मैदानावरील उपोषणाचे फलित काय? फक्त अण्णांचे वजन सहा-सात किलोने घटले. या आंदोलनात काहीच हाती लागले नाही.

मागच्या वेळेस गर्दी होती व प्रसारमाध्यमांनी वातावरणात धग निर्माण केली होती. आता प्रसारमाध्यमांनी अण्णांच्या बाबतीत अंगचोरपणा केला. अण्णांचे आंदोलन यशस्वी होऊ द्यायचे नाही हा सगळ्यांचाच अजेंडा होता. त्यामुळे दिल्लीतही मोठे मंत्री आणि राजकारणी अण्णांच्या भेटीस गेले नाहीत. सातव्या-आठव्या दिवशी अण्णांच्या घशाला जास्तच कोरड पडली तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाचारण केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच मध्यस्थीने उपोषण सुटायचे होते व त्यांच्या तत्त्वतः आश्वासनांवर भरवसा ठेवायचा होता तर मग रामलीला मैदानापेक्षा राळेगणसिद्धीत आंदोलन करायला हरकत नव्हती. ‘अखेर अण्णांचे उपोषण मागे’ या बातम्यांचे मथळे झळकायचेच होते, पण ते इतक्या गलितगात्र पद्धतीने झळकतील असे वाटत नव्हते. त्यामुळे अण्णांच्या गर्जनांचा पचपचीत गाजर हलवा झाला याचे वाईट वाटते. नरेंद्र मोदी किंवा राजनाथ सिंह रामलीला मैदानावर जातील ही अपेक्षा नव्हती, पण केंद्रातील एखादा कॅबिनेट मंत्री जाईल व उपोषण सुटेल असे वाटले होते, पण तसे घडले नाही. अण्णांनी पुढची तारीख देऊन उपोषण सोडले आहे. भ्रष्टाचारी तसाच आहे व शेतकऱ्यांची मरणे वाढत आहेत. अण्णांचे उपोषण सुटले व ते सुखरूप गावी परतले यातच आम्हालाही तत्त्वतः आनंद आहे.