राजीनाम्याखेरीज कामकाज चालू न देण्याचा शिवसेनेचा निर्धार; विदर्भातील आमदार समर्थनार्थ सरसावले
महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेनेने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने सुरू असताना स्वतंत्र विदर्भाची मागणी करीत भाजप आमदार आशीष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काही आमदारांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. अणे यांचा राजीनामा घेतल्यास विदर्भातील आमदार राजीनामे देतील, असे स्पष्ट करीत केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य लवकरच अस्तित्वात येईल, असे देशमुख यांनी सांगितले. मात्र अणे यांच्या राजीनाम्यासाठी शिवसेना आक्रमक असून त्याखेरीज सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असे शिवसेना आमदारांनी लोकसत्ताला सांगितले.

संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेल्यांचा अणे यांनी अवमान केला असून महाधिवक्ता पदावर असताना स्वतंत्र विदर्भाची भूमिका घेतल्याने संतप्त झालेल्या शिवसेना आमदारांनी सोमवारी तातडीची बठक घेऊन अणे यांच्याविरोधात निदर्शने करण्याचा निर्णय घेतला. खोतकर व गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी अणे यांच्या निषेधाचे आणि अखंड महाराष्ट्र राहिलाच पाहिजे, अशा मागणीचे फलक घेऊन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी सुरू केली. भाजपचे देशमुख व विदर्भातील काही आमदार तेथे होते. त्यांनीही शिवसेनेला प्रत्युत्तर देत स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा दिल्या. दरम्यान मुंबईतही शिवसेनेच्यावतीने हुतात्मा चौकात निदर्शने करण्यात आली.
भाजपचा छोटय़ा राज्यांच्या निर्मितीला पािठबा असून केंद्रात सत्ता असताना उत्तरांचलसह निर्माण केलेल्या राज्यांनी आपला चांगला विकास साधला आहे. वेगळा विदर्भ झाल्यास महाराष्ट्राचे कोणतेही नुकसान होणार नसल्याने त्यास विरोध करण्याचे कारण नाही. मराठी भाषिक दोन राज्ये तयार झाल्यास मराठी भाषा वृद्धिंगत होण्यास ते चांगलेच आहे, असे आशीष देशमुख यांनी सांगितले. अणे यांना आमचा संपूर्ण पािठबा असून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले, तर विदर्भातील आमदार राजीनामे देतील. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने आता स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होण्यास फार वेळ लागणार नाही. असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यावरही शिवसेनेच्या आमदारांनी ‘अखंड महाराष्ट्र राहिलाच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. लगेच राष्ट्रगीत व शोकप्रस्तावाचे कामकाज सुरू झाले. पण अणे यांच्या राजीनाम्याखेरीज सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे. छोटी व स्वतंत्र राज्ये निर्माण करावीत, ही भाजपची भूमिका आहे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या विदर्भातील अनेक नेत्यांनीही स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे, अशी भूमिका अनेकदा जाहीरपणे मांडली आहे.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा नाही -अणे
स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी आपली कोणतीही चर्चा झाली नसल्याचे श्रीहरी अणे यांनी लोकसत्ताला सांगितले. अधिवेशनात अन्य विषयांकडे लक्ष जाऊ नये, यासाठी हा मुद्दा उकरून काढल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. या पाश्र्वभूमीवर, स्वतंत्र विदर्भसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी कोणतेही बोलणे झाले नसल्याचे अणे म्हणाले. राज्यपाल किंवा राज्य सरकारने कोणतेही स्पष्टीकरण मागविलेले नाही. एका शिवसेना नेत्याने मला दूरध्वनी केला होता, पण प्रत्यक्ष भेटीत चर्चा करून आपली भूमिका विशद करू, असे उत्तर दिल्याचे अणे यांनी नमूद केले.

शिवसेनेची दखल नाही
अणे यांच्या वक्तव्याबद्दल त्यांना पाचारण करून आमच्या समक्ष स्पष्टीकरण विचारावे, त्यांची भूमिका आम्हालाही समजून घ्यायची आहे, अशी मागणी शिवसेना नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे रविवारी केली होती. पण अणे यांचे विधिमंडळातील व्याख्यान पुढे ढकलण्यात आल्याने ते सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीसाठी नवी दिल्लीला गेले. त्यामुळे नेत्यांच्या उपस्थितीत त्यांच्याकडून स्पष्टीकरण घेण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस बासनातच ठेवतील, अशी चिन्हे आहेत.