मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झालेले असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारमध्ये सहभागी होण्याचे संकेत शनिवारी येथे दिले. ‘महाराष्ट्रात सत्ता येणारच, ती जातेय कुठे?’, असे विधान करत शिवसेना पक्षप्रमुखांनी सत्तेतील सहभागाबाबत सकारात्मकता दाखवली. मात्र, त्याच वेळी जैतापुरातील अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा यापुढेही विरोध कायम असेल, असे उद्धव यांनी ठणकावले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील आठपैकी पाच जागांवर शिवसेनेचा विजय झाला. या पाश्र्वभूमीवर मतदारांचे आभार मानण्यासाठी उद्धव शनिवारी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांच्या दौऱ्यावर आले होते. गणपतीपुळे येथील हेलिपॅडवर उद्धव यांचे हेलिकॉप्टर उतरले. शेकडो शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर गणपतीपुळेतील मंदिरात जाऊन स्वयंभू गणेशाचे उद्धव यांनी सपत्नीक दर्शन घेतले. शिवसेना आमदार उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी उद्धव यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. रत्नागिरी व सिंधुदुर्गातील आठपैकी पाच आमदार निवडून देऊन कोकणातील जनतेने शिवसेनेवरील आपले प्रेम, निष्ठा व विश्वास दाखवून दिला आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानणे मी माझे परम कर्तव्य मानतो व त्यासाठीच माझा हा दौरा आहे, असे सांगत राजकारणावर बोलणार नसल्याचे उद्धव यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा प्रथमपासूनच विरोध असून तो यापुढे कायम राहणार असल्याचेही शिवसेना पक्षप्रमुखांनी ठणकावले. सत्तेतील सहभागाबाबत विचारले असता, ‘राज्यात आपली सत्ता येईल, ती जातेय कुठे?’, असे सांगत उद्धव यांनी सरकारातील सहभागाबाबत सकारात्मक संकेत दिले. उद्धव यांच्या दौऱ्यात आ. राजन साळवी, आ. सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आ. नीलम गोऱ्हे, सुभाष देसाई आदी उपस्थित होते.