30 November 2020

News Flash

केंद्रीय मंत्रिमंडळात सेनेला महत्त्वाच्या पदांची अपेक्षा

२०१४ मध्ये शिवसेनेची अवघ्या एका कॅबिनेट मंत्रिपदावर बोळवण करण्यात आली होती.

तीन ते चार जागांची इच्छा

मुंबई : लोकसभेत २०१४च्या कामगिरीची पुनरावृत्ती झाल्याने यंदा भाजप नेतृत्वाने केंद्रात अधिक मंत्रिपदे आणि चांगली खाती द्यावीत, अशी शिवसेनेची अपेक्षा आहे. युतीचा भाजपचा प्रस्ताव मान्य केल्याने तसेच पाच महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेता भाजपने गेल्या वेळप्रमाणे दुर्लक्ष करू नये, अशीच शिवसेनेची ठाम भूमिका आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात २०१४ मध्ये शिवसेनेची अवघ्या एका कॅबिनेट मंत्रिपदावर बोळवण करण्यात आली होती. अनंत गीते यांना अवजड उद्योग हे कमी महत्त्वाचे खाते देण्यात आले. तर १६ खासदार असलेल्या तेलुगु देसमला हवाई वाहतूकसारखे महत्त्वाचे खाते देण्यात आले होते. शिवसेनेने खाते बदलून देण्याची केलेली मागणीही मोदी यांनी मान्य केली नव्हती. मंत्रिमंडळ विस्तारात  नंतर एका राज्यमंत्रिपदाचा प्रस्ताव आला. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तो स्वीकारला नाही. शपथविधीसाठी अनिल देसाई हे दिल्लीला गेले होते, पण विमानतळावरूनच त्यांना माघारी फिरण्याचा आदेश देण्यात आला होता.

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यावर जानेवारी २०१८ मध्ये शिवसेनेने स्वबळावर लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली. त्यानंतर शिवसेना विरोधात गेल्यास महाराष्ट्रातील जागा कमी होतील, असे लक्षात आल्यावर भाजपने नमते घेऊन शिवसेनाला युतीसाठी राजी केले. त्याचवेळी केंद्रात पुन्हा सरकार आल्यावर दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदे मिळावीत, अशी भूमिका सेनेतर्फे मांडण्यात आली. आताच्या तुलनेत शिवसेनेचे कमी खासदार असूनही वाजपेयी मंत्रिमंडळात लोकसभेचे सभापतीपद, दोन कॅबिनेट मंत्रीपदे, राज्यमंत्रिपद अशी एकूण चार सत्तास्थाने शिवसेनेला मिळाली होती. आता त्यापेक्षा जास्त खासदार असल्याने ही संधी मिळावी अशी शिवसेनेची अपेक्षा आहे. अर्थात मोदी-शहा मित्र पक्षाचा किती सन्मान ठेवतात यावर सारे अवलंबून असेल.

मंत्रिपदावरून दोन्ही पक्षांत कटुता येणार नाही याची काळजी मात्र दोन्ही पक्ष घेणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात आता चांगला समन्वय आहे. उद्धव ठाकरे हे नवीन सरकार स्थापनेपूर्वी दिल्लीत होणाऱ्या रालोआच्या घटक पक्षांच्या बैठकीला जाणार आहेत. त्यावेळी ठाकरे हे मंत्रिपदांची संख्या आणि खात्यांबाबत  चर्चा करून अंतिम निर्णय घेतील, असे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

मंत्रिपदासाठी शिवसेनेत अनेक जण इच्छुक आहेत. विद्यमान केंद्रीय मंत्री अनंत गीते पराभूत झाल्याने यंदा नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकेल. कारण प्रत्येक वेळी गीते यांनाच मंत्रिपद दिले जात असे. त्याला शिवसेनेच्या खासदारांचा विरोध असायचा. चंद्रकांत खैरे, आनंद आडसूळ, शिवाजीराव आढळरा पाटील हे ज्येष्ठ खासदार पराभूत झाले आहेत. यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल, अशी शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2019 1:53 am

Web Title: shiv sena expecting important cabinet berth in modi government
Next Stories
1 लोकसभेला पराभव तरी विधानसभेसाठी सज्ज -आ. जगताप
2 ‘काम न करणाऱ्यांचा तीन महिन्यांत हिशेब चुकता करू’
3 जालन्यात भाजपकडून काँग्रेस सलग सातव्यांदा पराभूत
Just Now!
X