हर्षद कशाळकर

रायगड जिल्ह्य़ात सर्व जातीपाती, धर्मीयांना बरोबर घेऊन सामाजिक समीकरण राखण्याचा शिवसेनेचा प्रयोग सपशेल फसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांच्या चिरंजीवांना पक्षात घेऊन मुस्लीम समाजाला शिवसेनेच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न झाला, पण त्यात यश आले नाही. मुस्लीम समाज मोठय़ा प्रमाणात असणाऱ्या दक्षिण रायगडमधील श्रीवर्धन आणि महाड मतदारसंघांत शिवसेनेला मोठा फटका बसला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनी रायगड लोकसभा मतदारसंघात सामाजिक समीकरणाचा प्रयत्न केला. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव नावेद अंतुले यांना शिवबंधनात अडकवण्याची खेळी केली. श्रीवर्धन, मुरुड, दापोली मतदारसंघांतील मुस्लीम मते शिवसेनेच्या बाजूने वळविता यावी ही त्यामागची भूमिका होती. नावेद अंतुले यांच्यासमवेत सुलतान मुकादम, उस्मान रोहेकर अशी मुस्लीम नेत्यांची एक फळीच शिवसेनेने प्रचारात उतरवली होती. मात्र निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेचा हा प्रयोग सपशेल अपयशी ठरला.

एकीकडे प्रखर हिंदुत्वाची भाषा करायची आणि दुसरीकडे मुस्लीम समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न करायचा हे शिवसेनेचे धोरण मुस्लीम मतदारांनी साफ नाकारले. श्रीवर्धन, म्हसळा, रोहा, महाड, मुरुड, आबेत आणि बाणकोट या पट्टय़ात शिवसेनेची मोठी पीछेहाट झाली. एकटय़ा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना तब्बल ३८ हजारांचे मताधिक्य मिळाले. तर अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मुरुड येथेही सुनील तटकरे यांना दहा हजारांचे मताधिक्य मिळाले. महाड विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड समजला जातो. मात्र तिथेही शिवसेनेला जेमतेम सात हजारांचे मताधिक्य मिळाले.  आंबेत आणि बाणकोट खाडीपट्टय़ात शिवसेना मुस्लीम समाजावर प्रभाव पाडण्यात सपशेल अपयशी ठरली.

२०११ साली झालेल्या जनगणनेनुसार रायगड जिल्ह्य़ात एकूण २ लाख २७ हजार मुस्लीम लोकसंख्या आहे. हे प्रमाण सरासरी लोकसंख्येच्या ८.६४ टक्के एवढे आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, रोहा, म्हसळा आणि माणगाव तालुक्यांत मुस्लीम समाज मोठय़ा संख्येने आहे. हे लक्षात घेऊन मुस्लीम समाजाला शिवसेनेच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न अनंत गीते यांच्या माध्यमातून करण्यात आला होता. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील नाराज मुस्लीम नेत्यांना शिवसेनेत सामावून घेण्यात आले होते.

नाविद यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील मुस्लीम समाजाचे नाराज नेते शिवसेनेच्या संपर्कात आले होते. रोह्य़ातील उस्मान रोहेकर, महाडमधील इकबाल चांदले, म्हाप्रळमधील सुलतान मुकादम तर श्रीवर्धनमधून नाविद अंतुले यांनी शिवसेनेच्या प्रचाराची धुरा संभाळली होती. पण तरीही मुस्लीम मतांना शिवसेनेच्या बाजूने वळविण्यात अपयश आले. याउलट त्यांची पारंपरिक मतेही कमी झाल्याचे यानिमित्ताने समोर आले.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आपल्या सोशल इंजिनीअरिंगच्या प्रयोगाचा फेरविचार करणे गरजेचे आहे. मुस्लीम समाजाची मते शिवसेनेकडे कशी वळतील यासाठी प्रयत्न करावे लागतील. अन्यथा विधानसभा निवडणुकीत याची मोठी किंमत पक्षाल मोजावी लागेल यात शंका नाही.

गीते हे कुणबी समाजाचे असल्याने या समाजाची मते त्यांना मिळतील अशी व्यूहरचना करण्यात आली. पण त्याच वेळी अन्य समाज तटकरे यांच्याबरोबर गेले. गीते यांच्या विरोधातील नाराजीचा शिवसेनेला मोठा फटका बसला.