शिवसेनेच्या मार्गात अडचणीचे डोंगर असले तरी ते ओलांडले की डोंगराच्याच दगडांपासून आपल्या कार्याची स्मारके निर्माण होतील. २०१४ च्या राजकीय अपघाताची पुनरावृत्ती २०१९ मध्ये होणार नाही. यावेळी महाराष्ट्रात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईलच आणि दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे याचा निर्णय घेणारी ताकद राष्ट्रीय पातळीवर शिवसेना निर्माण करेल, असा दावा शिवसेनेने केला आहे.  मुंबई नासवण्याचे कारस्थान रचले जात असून मुंबईतील अनेक उपनगरांची नावे परस्पर बदलण्याचा सपाटा लावला आहे. ज्यांना या भागांची नावे बदलून बाजार’ मांडायचा आहे, त्यांनी आधी आपल्या बापांची नावे बदलून यावे, अशा शब्दात शिवसेनेने विरोधकांना सुनावले आहे.

शिवसेनेचा आज ५२ वा वर्धापन दिन असून या पार्श्वभूमीवर मंगळवारी सामनाच्या अग्रलेखातून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. धुळीचे लोट फक्त दिल्लीतच नव्हे तर देशभरातच उठले आहेत. मात्र, मोदी हे सातत्याने परदेशात असल्याने त्यांच्या डोळ्यात व श्वासात धुळीचे कण जात नसावेत, असा चिमटा शिवसेनेने काढला आहे. जनता बेजार आणि अडचणीत आहे. काश्मीरात जवानांची हत्या होत असून लोकांनी बहुमताने निवडून दिलेल्या सरकारचा गळा राजधानी दिल्लीतच आवळला जात आहे, याकडे लक्ष वेधत शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

असंख्य खाचखळग्यातून, काट्याकुट्यांतून शिवसेनेचा प्रवास झाला आणि त्यावर यशस्वी मात करत शिवसेना आज शिखरावर पोहोचली. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. कोणत्याही धनदांडग्यांच्या पाठिंब्याशिवाय शिवसेनेने भगव्याचे तेज विश्वभरात झळाळून सोडले. शिवसेनेचा भगवा हा भेसळीचा नसून शिवरायांचा आहे. यावर देशाने मोहोर उठवली आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे. शिवसेना नक्की काय व कसे करणार? असे प्रश्न ज्यांना पडले आहेत त्यांच्या गोवऱ्या स्मशानात गेल्या, पण शिवसेनेचा वेलू आजही गगनावर आहे. महाराष्ट्रावरही आघात सुरू आहे. पैसा व सत्तेचा विषप्रवाह मुंबईसह महाराष्ट्राचे रूप बदलू पाहत आहे. मुंबई नासवण्याचे कारस्थान रचले जात असून मुंबईतील अनेक नगरे-उपनगरांची नावे परस्पर बदलण्याचा सपाटा लावला आहे. परळ, दादर, गिरगाव, वडाळा, शीव, भायखळा, चिंचपोकळी ही त्याच नावाने ओळखली जातील. ज्यांना या ‘गावां’ची नावे बदलून अप्पर वरळी, न्यू कफ परेड वगैरे करून ‘बाजार’ मांडायचा आहे त्यांनी आधी आपल्या बापांची नावे बदलून यावे, असे शिवसेनेने म्हटले आहे.