स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठबळ देत, शिवसेनेने उसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपये दर मिळावा यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शिवसैनिकांना हाक देत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानावर आज मोर्चा काढला. मोर्चाला उपस्थिती मर्यादित असली तरी त्याच्या आक्रमकतेमुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करताना आता साखर आयुक्त विजय सिंघल यांना घेराव घालण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
दत्त चौकातून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाणा-या मार्गावर शिवसैनिकांनी ठिय्या मांडून आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना, काँग्रेस आघाडी शासनाला शेतक-यांनी खाली खेचल्याखेरीज न्याय मिळणार नसल्याचा दावा त्यांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनात सहभागी होऊन चांगलीच रंगत आणली. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
‘उसाला साडेतीन हजार रुपये पहिली उचल मिळालीच पाहिजे’ आणि ‘उसाला दर घामाचा, नाही कुणाच्या बापाचा’ अशा जोरदार घोषणाबाजींनी आक्रमक ठरलेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला. मोर्चात सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिंचेकर, कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, विजय देवणे, सातारा जिल्हाप्रमुख संजय मोहिते, जिल्हा उपप्रमुख दत्ताजीराव बर्गे, आनंदराव पवार, संदीप सुतार, हणमंत चवरे आदी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिका-यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, भाजपचे नितीश देशपांडे सहभागी झाले होते.
दत्त चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळय़ास अभिवादन करून प्रारंभ झालेला मोर्चा घोषणाबाजीने सारा परिसर दणाणून सोडत तहसील कचेरीवर आला. मात्र, येथे मोर्चाचे रूपांतर सभेत होईल असे गृहीत धरले जात असताना मोर्चा अचानक मागे वळून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या दिशेने चाल करू लागला. परंतु, दत्त चौकात हा मार्ग जलद कृती दलाच्या जवानांसह सशस्त्र पोलिसांनी रोखून धरल्याने मोर्चेक-यांनी संयमाची भूमिका घेऊन रस्त्यावरच ठिय्या मांडून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. संजय मोहिते यांनी रंगराजन समितीच्या शिफारशी जशाच्या तशा स्वीकारण्यात याव्यात, यंदाच्या उसाला साडेतीन हजार रुपये हमीभाव मिळावा अशी जोरदार मागणी केली.
महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे यांचा नामोल्लेख टाळत मोहिते यांनी त्यांच्यावर टीका केली. शिवसेना समाजकारणात राजकारण आणत नाही असे ठणकावून सांगत, आपण उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आश्रयाचे उपकार विसरलात, आता टीका कराल तर कराडमध्ये पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. मुरलीधर जाधव यांनी महागाई आणि खत, बियाणे व मजुरीत झालेली वाढ विचारात घेऊन उसाला वाढीव दर का मिळत नाही, असा सवाल केला. उसाला योग्य दर न मिळाल्यास विदर्भ, मराठवाडय़ाप्रमाणे येथेही शेतक-यांच्या आत्महत्येचे लोण येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सत्तापरिवर्तन करणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले.
सदाभाऊ खोत यांनी ऊसदराच्या आंदोलनात काही मंडळी जाणीवपूर्वक फूट पाडत असल्याचा आरोप करीत उद्या कराडमध्ये १ लाख शेतकरी दाखल होतील आणि ही आरपारची लढाई ऊसउत्पादकांना निश्चित न्याय मिळवून देईल, असा विश्वास दिला. मुख्यमंत्र्यांना शेतक-यांच्या बाजूने बोलण्याचे धाडस नाही. अन्यायकारक शासनाच्या कायद्याने महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. सुजित मिंचेकर यांनी स्वाभिमानीच्या उद्याच्या मोर्चाला शुभेच्छा देताना आघाडी शासनावर सडकून टीका केली. शिवसैनिकही शेतक-यांचीच मुले आहेत. त्यांच्याकडून येत्या निवडणुकात आघाडी शासनाला काय ते फलित मिळेल, असा इशारा दिला. राजेश क्षीरसागर म्हणाले, की महाराष्ट्राच्या ६५ वर्षांच्या वाटचालीत युतीला केवळ चार वष्रे सत्ता मिळाली. काँग्रेसने सलग सत्ता उपभोगताना सर्वसामान्यांना भरडले. त्यांच्या समस्या सोडवल्या नाहीत. युतीने ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले. परंतु, सध्या महागाई आणि अन्याय यामुळे जनता पिचली आहे. तरी काँग्रेस आघाडीला गल्लीपासून दिल्लीपर्यंत हद्दपार करा असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. विजय देवणे यांनी आंदोलनाचा हा पहिला टप्पा सुरू झाल्याचे स्पष्ट करून शिवसेना आंदोलन करणार म्हटल्यावर आजच कोल्हापूर जिल्ह्यातील तीन साखर कारखाने ‘एफआरपी’प्रमाणे उसाला २,८०० रुपये दर देण्यास राजी झाले असल्याचे सांगितले.