कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता

जितेंद्र पाटील, जळगाव

जिल्ह्य़ाच्या राजकारणावर काही वर्षे वर्चस्व प्रस्थापित करणारे भाजप नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचे महत्त्व कमी झाल्यानंतर जळगावची चावी आता शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या हाती येण्याची चिन्हे आहेत. नवीन मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद तसेच जळगावचे पालकमंत्रिपद मिळणे निश्चित मानले जात असून तसे झाल्यास खडसे, महाजन यांच्यासाठी तो मोठा धक्का असेल.

शाखाप्रमुख ते पक्षाचा नेता, असा गुलाबरावांचा प्रवास. पाळधी ग्रामपंचायतीपासून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. जिल्हा परिषदेनंतर थेट विधानसभेपर्यंत मजल मारली. जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपचा प्रभाव असणाऱ्या जिल्ह्य़ात गुलाबराव १९९९ मध्ये एरंडोल मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. ते सलग दोन वेळा निवडून गेले. २००९च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांनी त्यांचा पराभव केला तरी सेनेत त्यांचे महत्त्व कायम राहिले.  २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी देवकर जळगाव घरकुल गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात होते. त्यामुळे पाटील यांना तिसऱ्यांदा विधानसभेत संधी मिळाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना सहकार राज्यमंत्री पदावर बढती दिली. या शिवाय त्यांच्याकडे परभणीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीणमध्ये भाजपचे बंड मोडून काढत गुलाबरावांनी विजय मिळवला. त्यांच्याच नेतृत्वाखाली एरंडोल, पाचोरा, चोपडय़ात सेनेचे उमेदवार विजयी झाले. याशिवाय मुक्ताईनगरातील अपक्ष चंद्रकांत पाटील सेनेच्या तंबूत दाखल झाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर भाजप नेत्यांची जिल्ह्य़ातील मक्तेदारी आपोआप मोडीत निघाली. गुलाबरावांचे जळगावमधील महत्त्व त्यामुळे अधिकच वाढले. विधानसभा निवडणुकीचे निकाल एक प्रकारे भाजप नेते खडसे आणि महाजन यांना मिळालेली चपराक मानली जाते. जळगावच्या राजकारणाला त्यामुळे कलाटणी मिळणार असून, भाजपच्या बालेकिल्ल्यात पाळेमुळे रुजविण्याचा सेनेचा प्रयत्न राहील. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांतही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

सुरेश जैन यांना घरकुल गैरव्यवहारात शिक्षा झाल्यावर जिल्ह्य़ात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. ती गुलाबराव भरून काढण्याची चिन्हे आहेत. भाजपचे वर्चस्व असलेल्या जळगाव जिल्ह्य़ात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपचे प्राबल्य मोडून काढण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

भाजप नेत्यांशी नेहमीच संघर्ष

माजीमंत्री सुरेश जैन जळगाव घरकुल गैरव्यवहारात दोषी ठरल्यानंतर सेनेला जळगाव जिल्ह्य़ात भक्कम नेतृत्व उरले नव्हते. अशा वेळी गुलाबराव पाटील यांनी पक्षाला सावरले. जळगावच्या राजकारणावर अंकुश असलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्याशी गुलाबरावांचे कधी जमलेच नाही. २०१४ च्या निवडणुकीत भाजप-सेना एकमेकांच्या विरोधात लढल्यानंतर गुलाबरावांनी खडसे आणि महाजनांना लक्ष्य केले होते. त्यामुळे खडसे समर्थकांनी गुलाबरावांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी दिल्या होत्या. पुढे भाजप-सेनेची युती होऊनही खडसे आणि गुलाबराव यांच्यातील वितुष्ट कायम राहिले. दरम्यान, खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर गुलाबरावांचा विरोध थोडा मावळला. सहकार राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यावर त्यांनी भाजप विरोधात सूर आळवणे जवळपास बंदच केले. त्यामुळे महाजन यांची डोकेदुखी काहीकाळ थांबली. पण २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची कोंडी करण्याच्या उद्देशाने भाजपने जळगाव ग्रामीणमध्ये बंडखोरांना प्रोत्साहन दिल्यानंतर शेवटी बिनसले. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर महाजनांशी त्यांचे खटकेही उडाले होते.