अशोक चव्हाण यांची सूचना

भाजपसोबत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. एकिकडे सत्तेत रहायचे आणि दुसरीकडे आरोप करायचे हे सेनेचे धोरण आहे. याच पक्षाने ‘पाकिटमारांचे सरकार’ अशी टीका केली होती. त्यांच्यासमवेत ते सत्तेत आहेत. शिवसेनेला विरोधकाची भूमिका निभावयाची असल्यास त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले. दुष्काळ निवारणात अपयश आल्यामुळे सत्ताधारी हतबल झाले आहेत. त्यामुळे अधिवेशनाच्या तोंडावर मंत्र्यांनी दुष्काळी भागात दौरा आयोजित केल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

येथील लेवा पाटील भवनमध्ये आयोजित काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरूवात झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी दुष्काळी भागात सुरू असलेल्या मंत्रीमंडळाच्या दौऱ्यावर आक्षेप नोंदविले. दुष्काळाने उग्र रुप धारण केले असताना शेतकऱ्यांना या परिस्थितीत मदत करण्याची कृती मात्र शुन्य आहे. यामुळे दौऱ्याचे फलीत काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मेळाव्यात चव्हाण यांनी ‘राजकीय परिस्थितीतील बदल, काँग्रेसची भूमिका व भविष्यातील वाटचाल’ या विषयावर तर माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शासकीय कामकाज कसे चालते यावर माहिती दिली.

देशातील वातावरण बिघडवण्याचे काम

देशात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वातावरण बिघडविण्याचे काम करत आहे. मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक शेतकऱ्यांना मारहाण करतात. कन्हैय्या व वेमुला प्रकरणावरून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. त्यातील दोषींवर कारवाई न करता भाजप त्यांना पाठिशी घालण्याचे काम करत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.