News Flash

शिवसेना आमदाराची नांदेडमध्ये ‘कमळा’ला मदत !

तीन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये आयारामांची सुरुवात नांदेडमधून झाली.

भारतीय जनता पक्ष (प्रतिकात्मक छायाचित्र )

नांदेड म्हणजे अशोक चव्हाण हे समीकरण बदलण्यासाठी भाजपने सारा जोर लावला असून, पुढील महिन्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला धक्का देण्याकरिता भाजपने सारी ताकद पणाला लावली आहे. त्याकरिता मूळचे राष्ट्रवादीचे व  सध्या शिवसेनेचे आमदार असलेल्या प्रताप चिखलीकर यांची मदत भाजपने घेतली आहे.

तीन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये आयारामांची सुरुवात नांदेडमधून झाली. शंकरराव चव्हाण यांचे जावई भास्करराव खतगावकर यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत आपले नवीन राजकीय खाते भाजपत उघडले. पुढे  त्यांच्या माध्यमातून असे अनेक खातेदार भाजपला लाभले. अशोक चव्हाण विरुद्ध इतर सारे असे चित्र आकारास आले. पण विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नव्या खातेदारांना आपल्या राजकीय पुंजीचे रूपांतर कायम-मुदत करता आले नाही, म्हणजे जिल्ह्यात एक जागा वगळता भाजपचे आमदार वाढवता आले नाहीत. नंतरच्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांतही काँग्रेस पक्षच अव्वलस्थानी राहिला.

काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्यांमुळे भाजप कागदावर बलवान वाटत असताना दुसऱ्या बाजूला शिवसेनेने काँग्रेसला मागे टाकत विधानसभेच्या चार जागा जिंकल्या; पण नंतर स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांत या पक्षालाही चमक दाखवता आली नाही. काही निवडणुका भाजप-शिवसेना व राष्ट्रवादीने एकत्रपणे लढविल्या; पण जिल्हा बँक निवडणुकीतील यश वगळता हे तीन पक्ष काँग्रेसपुढे दुबळेच ठरले.

या राजकीय पाश्र्वभूमीवर येत्या काही आठवडय़ात नांदेड-वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होईल. मराठवाडय़ात औरंगाबादनंतर नांदेडची मनपा मोठी अन् राजकीयदृष्टय़ा महत्त्वाची. गेली दोन दशके या मनपावर काँग्रेस आणि अशोक चव्हाण यांची मजबूत पकड असून, ती मोडण्यासाठी खतगावकर-पोकर्णा-किन्हाळकर हे त्रिकूट कमी पडेल असे वाटल्यामुळे भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना दत्तक घेतल्यामुळे तसेच या पक्षात अधिकृत प्रवेश न करताच त्यांनी रणनीती आखली आहे. मनपा निवडणुकीत नांदेडमध्ये भाजपची सारी मदार इतर पक्षांतून आलेल्या नगरसेवकांच्या यशावर अवलंबून असल्याचे निवडणुकीपूर्वीच स्पष्ट झाले.

मागील (सन २०१२) मनपा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करून भाजपने १६ जागा लढविल्या होत्या; त्यातील केवळ दोन जण निवडून आले. आता या पक्षाने स्वबळाचे लक्ष्य ठेवले असून पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने दोन वरून ४२ जागांचा नारा आधीच दिला. हा आकडा गाठण्याची अवघड जबाबदारी प्रताप पाटील व भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांना आता पार पाडायची आहे.

भाजपच्या निवडणूक नियोजनाची सूत्रे चिखलीकर यांनी सोमवारी सकाळी अप्रत्यक्षपणे हाती घेतल्यानंतर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० नगरसेवकांनी आपल्या संपुष्टात येत चाललेल्या पदाचे राजीनामे देऊन मोठी प्रसिद्धी मिळविली. त्यांच्या पंगतीत आणखी काही जण जाऊन बसण्याची शक्यता असून हे सर्व जण भाजपतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या तसेच इतर कार्यकर्त्यांच्या आगमनामुळे भाजपत वेगवेगळ्या प्रभागांत इच्छुकांचा सुकाळ झाला हे खरे; पण आता पुढच्या टप्प्यात खरी कसोटी आहे ती आ.चिखलीकरांची. यापूर्वी भाजपत आलेल्या नेत्यांच्या मर्यादा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी नाही; पण मुख्यमंत्र्यांनी ओळखल्या त्यामुळे त्यांनी धाडस दाखवीत चिखलीकरांवर मनपा निवडणुकीची जबाबदारी टाकली आहे, असे मानले जाते.

आ.चिखलीकर यांनी वेळोवेळी अशोक चव्हाण यांना मनपा निवडणुकीत आव्हान दिले होते. पण गाजावाजा अधिक अन् यश नगण्य असे अंतिमत: स्पष्ट झाले होते. प्रतापराव जेव्हा अत्यंत आक्रमकपणे चव्हाण यांच्याविरोधात गेले तेव्हा अपयशी ठरले.

नांदेडच्या भाजपला चंद्रकांत मस्की, भोजालाल गवळी, बाळासाहेब पांडे, गणपत राऊत, मदनमामा देशपांडे, राम चौधरी, आनंद इनामदार, प्रा.एकताटे अशा निष्ठावंतांचा इतिहास आहे. पण गेल्या काही वर्षांतील काँग्रेसीकरणामुळे पक्षाचा हा इतिहास बदलत चालला आहे.

  • मागील (सन २०१२) मनपा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करून भाजपने १६ जागा लढविल्या होत्या; त्यातील केवळ दोन जण निवडून आले. आता या पक्षाने स्वबळाचे लक्ष्य ठेवले असून पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने दोन वरून ४२ जागांचा नारा आधीच दिला. हा आकडा गाठण्याची अवघड जबाबदारी प्रताप पाटील व भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांना आता पार पाडायची आहे.
  • भाजपच्या निवडणूक नियोजनाची सूत्रे चिखलीकर यांनी सोमवारी सकाळी अप्रत्यक्षपणे हाती घेतल्यानंतर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० नगरसेवकांनी आपल्या संपुष्टात येत चाललेल्या पदाचे राजीनामे देऊन मोठी प्रसिद्धी मिळविली. त्यांच्या पंगतीत आणखी काही जण जाऊन बसण्याची शक्यता असून हे सर्व जण भाजपतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
  • नांदेडच्या भाजपला चंद्रकांत मस्की, भोजालाल गवळी, बाळासाहेब पांडे, गणपत राऊत, मदनमामा देशपांडे, राम चौधरी, आनंद इनामदार, प्रा.एकताटे अशा निष्ठावंतांचा इतिहास आहे. पण गेल्या काही वर्षांतील काँग्रेसीकरणामुळे पक्षाचा हा इतिहास बदलत चालला असून खतगावकर, पोकर्णा, किन्हाळकर आणि आता चिखलीकर यांच्यामुळे या पक्षाचे वर्णन इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर असे केले जाते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 1:21 am

Web Title: shiv sena help bjp in nanded
Next Stories
1 निम्न वर्धा प्रकल्पग्रस्तांच्या दुर्दैवाचे दशावतार!
2 गणेशमुर्तीकारांना जीएसटीची धास्ती
3 सिंधुदुर्गातील पोलिसांसाठी घरयोजना मंजूर -दीपक केसरकर
Just Now!
X