शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही, असे विधान करुन शिवसेनेच्या विद्यमान नेतृत्वावर टीका करणाऱ्या योगी आदित्यनाथांवर शिवसेनेने पलटवार केला. विधान परिषद निवडणुकीत कोकण आणि नाशिकमध्ये शिवसेनेविरोधात राष्ट्रवादीशी केलेली युती हा कोणाच्या पाठीत खंजीर होता, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. त्यामुळे विश्वासघात, खंजीर खुपसणे हे शब्द योगी आदित्यनाथ किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी शोभत नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आलेल्या योगी आदित्यनाथांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले होते. बाळासाहेबांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही. शिवसेनेची वर्तमान परिस्थिती पाहून सर्वात जास्त दु:ख बाळासाहोबांच्या आत्म्याला होत असेल, असे त्यांनी म्हटले होते. योगी आदित्यनाथांच्या टीकेचा शुक्रवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून समाचार घेण्यात आला.

ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत त्यांच्या हयातीत खंजीर खुपसले त्यांच्या हातांना भाजपाने ‘मेहंदी’ लावून नवरदेव बनवले. त्यामुळे विश्वासघात, खंजीर खुपसणे हे शब्द योगी आदित्यनाथ किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी शोभत नाहीत, असे शिवसेनेने सुनावले आहे. अफझलखानाने शिवरायांच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवरायांनी सरळ समोरून खानाचा कोथळाच काढला. ज्यांना शिवरायांना हार घालण्याआधी पायातल्या चपला काढता येत नाहीत त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची, असे अग्रलेखात म्हटले आहे.

विधान परिषद निवडणुकीत नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्याविरोधात भाजपाने ऐन वेळी राष्ट्रवादीचा मुका घेतला. पण मुका नीट घेता आला नाही व उमेदवाराच्या ओठाचा लचका पडला. शिवसेनेविरोधात जितके डाव टाकाल तितकी शिवसेना जोरात पुढे येईल, असा इशाराही अग्रलेखातून देण्यात आला. उत्तर प्रदेशचे ढोंगी मुख्यमंत्री पालघरात आले आणि तोफांतून पिचकाऱ्या मारून गेले. अशा पिचकाऱ्या सोडणाऱ्यांना इतिहास किंवा छत्रपती समजलेच नाहीत, अशी बोचरी टीका शिवसेनेने केली आहे.

पालघरात शंभर नंबरी काँग्रेसवाले राजेंद्र गावित यांना उमेदवारी देऊन त्यांच्या प्रचारासाठी येऊन शिवसेनेवर आग्यावेताळाप्रमाणे बोलणे यास पाठीत खंजीर खुपसणे नाही म्हणावे तर काय म्हणावे?, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena hits back at uttar pradesh cm yogi adityanath
First published on: 25-05-2018 at 08:24 IST