जम्मू- काश्मीरमधील दहशतवादी कारवायांवरुन शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे. सांगली, जळगाव आणि राज्यसभेत उपसभापतीपद जिंकले. पण काश्मीरमधील दहशतवादावर निर्णायक विजय कधी मिळवणार? आणखी किती मेजर राणेंचे बलिदान घेणार याचे उत्तर द्या व २०१९ च्या निवडणुकांना सामोरे जा, असे शिवसेनेने म्हटले आहे. सैनिकांच्या हौतात्म्याची तरी जुमलेबाजी करू नका, अशी बोचरी टीकाही शिवसेनेने केली.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मीरा रोड येथील मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. या पार्श्वभूमीवर शनिवारी सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर टीकेचा भडीमार केला. महाराष्ट्राचे वीर सुपुत्र कौस्तुभ राणे शहीद झाले. फक्त निवडणुका जिंकण्यातच मग्न असलेल्या राज्यकर्त्यांनी शरमेने मान खाली घालावी असे पाकिस्तानी तांडव कश्मीरात सुरू आहे. कडेकोट सुरक्षेच्या पिंजऱ्यात फिरणाऱ्या दिल्लीतील राज्यकर्त्यांना मेजर राणे व तीन जवानांच्या बलिदानाचे महत्त्व कळणार नाही, अशा शब्दात शिवसेनेने मोदी सरकारला फटकारले.

वाटेल त्या मार्गाने निवडणुका जिंकणे म्हणजे शौर्य नसून देशासाठी मरण पत्करणे हेच खरे शौर्य आहे. कश्मीर प्रश्नाचा सर्वाधिक विचका आणि आंतरराष्ट्रीय पचका गेल्या चार वर्षांतच झाला आहे. पाकिस्तानमधून दहशतवादी घुसखोरी करतच आहे. जवान शहीद होतायेत. विरोधकांना धाराशायी केल्याचा आनंद मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. पण पाकिस्तानला धाराशायी केल्याचा आनंद हा देश कधी साजरा करणार?, असा सवाल शिवसेनेने विचारला.

पैसा फेकून, ई.व्ही.एम. बंद पाडून निवडणुका जिंकणे सोपे आहे, पण ‘कौस्तुभच काय, आणखी मुले असती तर तीदेखील देशासाठी दिली असती,’ असे सांगणाऱ्या शहीद कौस्तुभच्या पित्याची हिंमत बाजारात मिळत नाही, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

कश्मीर वाचवणे हे आपल्या राज्यकर्त्यांचे कर्तव्य नाही का?, हौतात्म्य पत्करलेला प्रत्येक सैनिक अमर होतो, पण प्रत्येक हौतात्म्यानंतर मोदी सरकारवरील जनतेचा विश्वास कमी होतो. आणखी किती मेजर राणेंचे बलिदान घेणार याचे उत्तर द्या व २०१९ च्या निवडणुकांना सामोरे जा. सैनिकांच्या हौतात्म्याची तरी जुमलेबाजी करू नका. सैनिकांच्या बलिदानानंतर डी.जे. वाजवून गोंधळ घालणाऱ्यांचे राज्य आम्हाला नकोय, तसे नक्राश्रू ढाळणाऱ्यांचेही नको, असेही अग्रलेखात म्हटले आहे.