अयोध्येत राममंदिर भूमिपूजनाच्या दिवशी ‘बोकड पार्टी’ करून नंतर श्रीराम पूजन करणाऱ्या भाजपच्या काही जिल्हा परिषद सदस्यांच्या कृतीने जिल्हा परिषद अपवित्र झाल्याचा आरोप शिवसेनेच्या सदस्या सुनिता सोनवणे यांनी केला आहे.

भाजपच्या कृतीमुळे जिल्हा परिषद अपवित्र झाल्याने सोमवारी परिषदेच्या आवारात गोमूत्र शिंपडून प्रवेशव्दाराजवळच सत्यनारायणाची पूजा सोनवणे यांनी आयोजित केली.

जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजपा आणि विरोधक शिवसेनेत राजकीय युध्द रंगू लागले आहे.

याला निमित्त मिळाले ते राममंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या दिवशी जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेनिमित्त झालेल्या मांसाहारी भोजनावळीचे. भाजपच्या काही जिल्हा परिषद सदस्यांनी त्यादिवशी बोकड पार्टी केली. त्यानंतर त्यांनी श्रीराम पूजन केले. यासंदर्भातील माहिती मिळाल्यावर भाजपवर सर्व बाजूंनी टीका होऊ लागली.

तोच धागा पकडत सोमवारी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे आणि त्यांच्या जिल्हा परिषद सदस्य पत्नी सुनिता सोनवणे यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात गोमूत्र शिंपडून थेट सत्यनारायणाची पूजा घातली. भाजपच्या भ्रष्टाचारामुळे आणि बोकड फस्त करणाऱ्या भाजप सदस्यांमुळे जिल्हा परिषद बदनाम झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला गोमूत्र शिंपडून आणि सत्यनारायणाची पूजा करून पवित्र करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच श्रावण महिन्यात अशुभ झालेली वास्तु किंवा कलंकित झालेली व्यक्ती यांचा कलंक पुसला जावो, अशी प्रतिक्रिया सुनिता सोनवणे यांनी दिली.