मुंबई विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाचे संचालक योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यावरून वाद सुरू झाला असताना, ती कारवाई राजकीय नसून मुळात त्या पदावर नियुक्त व्हावे अशी सोमण यांची पात्रताच नव्हती, असे विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

योगेश सोमण यांनी राहुल गांधी यांच्याबाबत समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मत नोंदवले होते. त्यानंतर एनएसयूआय या संघटनेने सोमण यांना हटवण्याची मागणी सुरू केली. नाटय़शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनीही विभागात पुरेशा सुविधा नसल्याचा आक्षेप घेत आंदोलन सुरू केले. छात्रभारती या संघटनेनेही आंदोलनात उडी घेतली. अखेर विद्यापीठाने १३ जानेवारी रोजी सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केली. त्यानंतर सोमण यांना भाजपच्या नेत्यांनी पाठिंबा दिला.

या पार्श्वभूमीवर विरोधी विचारांच्या लोकांबद्दलच्या महाविकास आघाडीच्या भूमिकेबाबत विचारता, योगेश सोमण यांचे काम विद्यार्थ्यांना शिकवायचे होते. प्राध्यापकाने राजकीय भाष्य करण्याचे कारण नव्हते. मुळात त्या पदावर काम करण्याची योगेश सोमण यांची पात्रताच नव्हती, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.