पदरमोड करून ग्रामस्थांच्या मदतीने गाव गाठण्याचा आटापिटा

सतीश कामत, लोकसत्ता

रत्नागिरी : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घाईघाईत लागू केलेल्या टाळेबंदीमुळे परप्रांतीय मजुरांसारखेच हाल सहन करावे लागलेले कोकणवासीय संधी मिळताच आश्रयासाठी गावाकडे धावत सुटल्यावर शिवसेनेच्या नेते-कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे चक्क पाठ फिरवली आहे. त्यामुळे भरमसाट पदरमोड करून केवळ स्थानिक ग्रामस्थांच्या आधारे घर गाठण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

कोणतीही पूर्वसूचना न देता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुमारे दोन महिन्यांपूर्वी अवघ्या चार तासांचा अवधी देऊन देशात टाळेबंदी लागू केली तेव्हा ती पुढे किती काळ चालेल, याचा खुद्द मोदींसह कुणालाच अंदाज नव्हता; पण पोलीस आणि प्रशासनाच्या बळावर निर्दयीपणे लागू केलेल्या या बंदीच्या तारखा वाढत चालल्या तसतसा मुंबईत अतिशय गैरसोईच्या वातावरणात जगत असलेल्या कष्टकरी वर्गाचा धीर सुटायला लागला. लक्षावधी परप्रांतीयांबरोबरच कोकणातून पिढय़ान्पिढय़ा मुंबईमध्ये राबणाऱ्या कोकणवासीयांचाही त्यामध्ये समावेश होता. फरक इतकाच की, परप्रांतीयांपेक्षा त्यांची गावे-घरे मुंबईपासून कमी अंतरावर होती. त्यातही रायगड आणि रत्नागिरीच्या उत्तरेकडील मंडणगड, दापोली आणि खेड हे तीन तालुके मुंबई-ठाण्यापासून तसे कमी अंतरावर. त्यामुळे या भागातील कोकणी लोकांनी सरळ गावांच्या दिशेने चालायला सुरुवात केली. शक्य होते त्यांनी रात्रीच्या अंधारात खासगी मालवाहू गाडय़ांमधून जमेल तितके अंतर कापत गाव गाठले, तर कुणी रेल्वेगाडय़ा बंद असल्याचा फायदा घेत रुळांचाही आधार घेतला. सुरुवातीला रोजची ही संख्या दोन आकडी होती; पण हळूहळू ती वाढतीच राहिल्यामुळे हा ओघ आता थोपवणे शक्य नाही, हे लक्षात आल्यावर सरकारने दोन्ही बाजूंच्या जिल्हाधिकाऱ्यांची संमती असलेली अधिकृत प्रवेशपत्राची ऑनलाइन पद्धत सुरू केली. मुंबईतून पोलीस विभागातर्फेही स्वतंत्रपणे ई-पास दिले जाऊ लागले. त्यामुळे एकटय़ा रत्नागिरी जिल्ह्य़ात गेल्या ३ दिवसांत दररोज दहा हजारांपेक्षा जास्त चाकरमानी येऊ लागले आहेत.

एरवी गणपती किंवा शिमग्याच्या काळात कोकणात गावोगावी या कोकणवासीयांचे मोठय़ा प्रेमाने स्वागत केले जाते; पण या वेळी त्यांच्याबरोबर करोना हा झपाटय़ाने पसरणारा आणि ठोस उपचार नसलेला रोगही येऊ शकतो, या जाणिवेमुळे अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यातच आलेल्या कोकणवासीयांपैकी काही जणांचे तपासणी अहवाल सकारात्मक आल्यामुळे आणि या लोकांवर नियंत्रण राहिले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशा आशयाचे विधान खुद्द रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनीच केल्यामुळे काही ठिकाणी विरोधीही प्रतिक्रिया उमटली. मात्र बहुसंख्य गावांमध्ये स्थानिक ग्रामस्थांनी कौटुंबिक जिव्हाळ्यापोटी या मंडळींकडून संसर्ग न होण्यासाठी आवश्यक विलगीकरण्याची यंत्रणा गाव पातळीवर उत्तम प्रकारे उभी केली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करून फिरणाऱ्यांमुळे संसर्ग वाढू नये म्हणून काही प्रमुख स्थानिक बाजारपेठा सलग ३-४ दिवस बंद ठेवल्या जात आहेत.

सुरुवातीच्या टप्प्यात आलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या घशातील द्रावाचा नमुना घेऊन तपासणीसाठी पाठवण्याचे धोरण जिल्हा प्रशासनाने अवलंबले होते; पण येणाऱ्यांची संख्या वाढू लागली तसा त्यातील अव्यवहार्यपणा लक्षात येऊन आता फक्त बाह्य़ लक्षणे तपासून संशयास्पद वाटले तरच पुढील तपासणी किंवा उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करून घेतले जात आहे. अन्यथा, शक्यतो गाव पातळीवर संस्थात्मक किंवा गृह विलगीकरणासाठी पाठवले जात आहे. मात्र तेथेही वैद्यकीय तपासणीसाठी पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रणा नसल्याने दहा-बारा तासांचा प्रवास करून आलेल्या मुंबईकर कोकणवासीयांना आणखी काही तास रखडावे लागत आहे.

शिवसेनेच्या स्थानिक पुढाऱ्यांपासून पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एरवी ‘कोकण आमुचे हक्काचे.’ असे उच्चरवात सांगत असले तरी या कठीण समयी मात्र सर्वानी कोकणवासीयांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात ५ पैकी ४ आमदार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या रूपाने राज्य पातळीवरील वजनदार नेता, अख्खा एसटी विभाग नियंत्रणाखाली असलेले परिवहनमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अनिल परब, स्थानिक खासदार आणि पक्षाचे संघटन सचिव विनायक राऊत, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेवर निर्विवाद वर्चस्व हे सारे पोकळ वाटावे असे एरवी वाडय़ा-वस्त्यांवर मतांसाठी हक्काने जोगवा मागत फिरणाऱ्या या पक्षाच्या नेते-कार्यकर्त्यांचे सध्याच्या परिस्थितीतील वर्तन आहे. अशा परिस्थितीत कुटुंबीय आणि स्थानिक ग्रामस्थ हेच या कोकणवासीयांसाठी तारणहार ठरले आहेत.

मुंबईतील कोकणवासीयांच्या नाराजीची आम्हाला कल्पना आहे; पण शेवटी आमचाही नाइलाज आहे. सर्वाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कोकणातील आरोग्य सेवा तेवढी सक्षम नाही. आरोग्य सेवेवर अधिक ताण पडू नये हा प्रयत्न आहे. शिमगा किं वा गणपतीच्या सणाप्रमाणे कोकणवासीयांनी कोकणात जाण्याची घाई करू नये. परराज्यातील मजुरांप्रमाणेच त्यांना कोकणात एस.टी.ने सोडण्याची आमची योजना होती; पण मुंबई व अन्य परिसरांतून आलेल्यांमुळे कोकणात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढली. परिणामी एस.टी. सेवा तूर्त स्थगित करावी लागली. थोडा धीर धरा, नक्कीच सर्वाना मदत करू.

– विनायक राऊत, खासदार, संसदीय गटनेते, शिवसेना