रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये मिळून असलेल्या विधानसभेच्या १५ जागांसाठी बुधवारी झालेले मतदान लक्षात घेता पुन्हा एकवार शिवसेना कोकणचा गड राखण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर भाजपच्या स्थितीमध्येही सुधारणा होण्याची शक्यता दिसत आहे.
राज्यात शेतकरी कामगार पक्षाचे अस्तित्व टिकून असलेल्या रायगड जिल्ह्यातील सात जागांपैकी बहुतेक ठिकाणी शेकाप आणि सेना यांच्यातच मुख्य लढती झाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पुतण्या अवधूत तटकरे यांना श्रीवर्धन मतदारसंघात सेनेचे उपजिल्हाप्रमुख रवी मुंडे यांनी चांगली टक्कर दिल्यामुळे या मतदारसंघाकडे विशेष लक्ष आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पाच जागांपैकी दापोली, चिपळूण आणि राजापूर या तीन ठिकाणी सेनेचे आमदार आहेत. बुधवारी झालेल्या मतदानाचा कल लक्षात घेता चिपळूणची जागा अडचणीत येण्याची शक्यता दिसत आहे. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी शिवसेनेत प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री उदय सामंत यांना रत्नागिरी मतदारसंघामध्ये भाजपचे बाळ माने यांनी जोरदार लढत दिली आहे. या मतदारसंघात झालेले कमी मतदान माने यांना फायद्याचे असल्याचा त्यांच्या पाठिराख्यांचा दावा आहे.
राणे पिता-पुत्रांना कडवे आव्हान
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे (कुडाळ) व त्यांचे चिरंजीव नितेश (कणकवली) सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे साऱ्या राज्याचे लक्ष वेधले आहे. कणकवलीत भाजपाचे विद्यमान आमदार प्रमोद जठार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची झालेली सभा निर्णायक ठरू शकते, तर कुडाळमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनीही राणेंच्या विजयाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण केले आहे. त्या तुलनेत सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर यांचा विजय जास्त सुकर मानला जात आहे.
राज्याच्या अन्य भागांप्रमाणे कोकणपट्टीतही सर्वत्र बहुरंगी लढती झाल्या असल्या तरी बहुतेक ठिकाणी शिवसेना पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहील, असे चित्र आहे.