|| राजेश्वर ठाकरे

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी प्रतिनिधित्व केलेला आणि १९९९ पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला रामटेक लोकसभा मतदारसंघ नंतर शिवसेनेच्या ताब्यात गेला. भाजपची साथ मिळाल्याने शिवसेनेला विजय शक्य झाला. यंदा मात्र शिवसेनेपुढे कडवे आव्हान आहे. युती नसल्यास शिवसेना, भाजप आणि काँग्रेस या तिरंगी लढतीचा कोणाला फायदा होतो याची उत्सुकता आहे.

काँग्रेसविरोधी लाटेत नवमतदारांच्या भरभरून मिळालेल्या मतांच्या भरवशावर रामटेकचा गड सर करणारे खासदार कृपाल तुमाने यांना पुन्हा येथे शिवसेनेचा भगवा फडकावणे सोपे नाही. शिवसेनेचा एकही आमदार नसल्याने या मतदारसंघात भाजपने संघटना चांगली मजबूत केली आहे, तर तीन राज्यांतील निवडणुकीत विजय मिळाल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे.  रामटेकमध्ये सुबोध मोहिते यांना उमेदवारी देऊन शिवसेनेने सर्वप्रथम १९९९ मध्ये खिंडार पाडले. तेव्हापासून या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढाई झाली आहे. मोहिते यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००७ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या प्रकाश जाधव यांनी मोहिते यांचा पराभव केला होता. तेव्हाही प्रतिकूल परिस्थितीत शिवसेनेने गड कायम राखला होता. २००९ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर रामटेक मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. तेव्हा काँग्रेसचे वजनदार नेते मुकुल वासनिक यांनी बुलढाणा मतदारसंघ सोडून रामटेक मतदारसंघाची निवड केली आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी शिवसेनेचे कृपाल तुमाने यांना पराभूत केले. मात्र २०१४ निवडणुकीत कृपाल तुमाने यांनी बाजी मारली.

भाजप आणि शिवसेना युतीत रामटेक मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. युती नसल्यास शिवसेनेची डाळ शिजणे कठीण जाईल, अशी चिन्हे आहेत. काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी कमी नाही. रामटेक मतदारसंघाची सीमा लागून असलेल्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा परिसरात काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले होते. छिंदवाडाचे कमलनाथ हे मुख्यमंत्री झाले. छिंदवाडामधील या यशाचा परिणाम रामटेकमध्ये नक्कीच होईल, अशी काँग्रेसमध्ये अटकळ बांधली जाते. बहुधा, यातूनच माजी खासदार मुकुल वासनिक यांची पावले पुन्हा रामटेककडे वळली आहेत. गेल्या आठवडय़ात झालेल्या राज्य काँग्रेस संसदीय मंडळाच्या बैठकीत वासनिक यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. पण सावनेरचे आमदार सुनील केदार यांची नाराजी वासनिक यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. केदार यांनी वासनिक यांच्या उमेदवारीला ठाम विरोध दर्शविला होता.

कृपाल तुमाने यांनी विकासकामांचा दावा केला आहे. त्यांनी उमरेडजवळ काँग्रेसच्या काळात प्रस्तावित निम्ज (नॅशनल इव्हेस्टमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग झोन)साठी पाठपुरावा केला. परंतु त्याच्या भूसंपादनासाठी केंद्राने निधीची तरतूद केलेली नाही. त्यांच्या प्रयत्नाने फेरो अ‍ॅलॉय प्रकल्प मंजूर झाला. हा प्रकल्प मॉइलद्वारे उभारण्यात येणार आहे. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.

हा प्रकल्प १००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमधून खापा, सावनेर येथे उभा राहणार आहे. पूर्वी हा प्रकल्प भिलाई येथे उभारण्यात येणार होता, परंतु पाठपुरावा आणि पत्रव्यवहार करून हा प्रकल्प रामटेक लोकसभा क्षेत्रात आणला, असा दावा तुमाने यांनी केला आहे.  पर्यटनस्थळाचा विकास, राष्ट्रीय महामार्ग, उत्तम स्वरुपाचे रस्ते, सीआरएफ निधीमधून मोठय़ा प्रमाणात निधी रामटेक लोकसभा क्षेत्रासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. तुमाने हे खासदार निधी खर्च करण्यात सर्वात आघाडीवर आहेत. त्यांनी आतापर्यंत २२ कोटी रुपये खासदार निधी, जिल्हा वार्षिक योजनेतून १२ कोटी, तीर्थक्षेत्र विकासासाठी चार कोटी रुपये मंजूर करून विकास कामे सुरू केलेली आहेत.

पंतप्रधान सहायता निधीमधून सुमारे ९० गरजू गरीब रुग्णांना मदत करण्यात आली. सुमारे एक कोटी रुपये वितरित करण्यात आले. मनसर येथे वाकाटाक कालिन अवशेष आढळले. युनेस्कोकडे या ठिकाणांना त्यांचे जतन करून, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे संग्रहालय आणि वर्ल्ड हेरिटेज सेंटर निर्माण करण्यासंदर्भात त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. क्रीडाप्रेमींसाठी जवळपास ३ कोटी रुपयांची व्यायामशाळा, आम दंगल आखाडा आणि साहित्य तसेच अन्य क्रीडा साहित्य विविध योजनेद्वारे मंजूर करून वितरित करण्यात आले.

‘‘महाराष्ट्रातून खासदार निधी खर्च करण्यात मी सर्वात आघाडीवर आहे. २२ कोटी रुपये खासदार निधी, जिल्हा वार्षिक योजनेतून १२ कोटी, तीर्थक्षेत्र विकासासाठी चार कोटी रुपये, नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत ५ कोटी रुपये आजपर्यंत माझ्या कालावधीमध्ये मंजूर करून विकास कामे सुरू झाली आहेत.’’   – कृपाल तुमाने खासदार, रामटेक लोकसभा.

खासदार तुमाने यांच्याकडून सांगण्यासारखे एकही काम झाले नाही. राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प २०११ मध्ये मंजूर झाले होते. गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त रामटेक मतदारसंघात आहेत. त्यांचे प्रश्न सोडवणे अपेक्षित होते. परंतु ते खासदार म्हणून काम करण्यात कमी पडले. यापूर्वी मुकुल वासनिक यांनी झुडपी जंगलाचा प्रश्न मार्गी लावला. राष्ट्रीय महामार्ग मंजूर केले. मौदा औष्णिक प्रकल्पाची क्षमता वाढवली. त्या तुलनेत तुमाने कुठेच नाहीत. केंद्राच्या पातळीवरचे कोणते काम त्यांच्याकडून झाले, असे त्यातले एखादे तरी त्यांनी सांगावे.         – राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस, नागपूर जिल्हा.