|| नीरज राऊत

पालघर म्हणजेच पूर्वाश्रमीचा डहाणू हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला काँग्रेसचा पारंपरिक गड भाजपने सर केला. भाजपने बस्तान बसविले असतानाच शेजारच्या ठाणे मतदारसंघाप्रमाणेच शिवसेनेने हा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतला. गेल्या वर्षी पोटनिवडणुकीत हा मतदारसंघ निसटत्या मतांनी गमवावा लागला, ही सल शिवसेनेच्या मनात होती. गतवेळच्या पराभवाची खूण पुसण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असला तरी भाजपमधील नाराजी दूर करण्याचे शिवसेनेसमोर आव्हान असेल. शिवसेनेशी सामना करण्याकरिता बहुजन विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली विरोधकांची मोट बांधण्यात आली आहे.

पालघर मतदारसंघातून विजयी झालेले भाजप खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या पालघर मतदारसंघातील पोटनिवडणूक राज्यभर गाजली होती. वनगा यांच्या पुत्राला भाजपने उमेदवारी देण्यास टाळाटाळ केली. यामुळे वनगा पुत्राने थेट शिवसेनेत प्रवेश केला. यातून मग भाजप विरुद्ध शिवसेना अशी चुरशीची लढत झाली होती. भाजपकडे उमेदवारांची वानवा होती. शेवटी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना आयात करण्यात आले. भाजपने सारी ताकद पणाला लावून या मतदारसंघात २९ हजार मतांनी विजय मिळविला.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पालघरचा मतदारसंघ शिवसेनेने प्रतिष्ठेचा केला आहे. या जागेवर भाजपने आपला दावा कायम ठेवला असून अजूनही पालघरच्या जागेची घोषणा करण्यात आली नाही. शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांच्यासह वनगा कुटुंबातील इतर सदस्यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरू केल्याने उमेदवारीबाबतचा संभ्रम कायम राहिले आहे. रविवारी उमेदवारीची घोषणा केली जाईल, असे शिवसेना नेता सुभाष देसाई यांनी जाहीर केले. पोटनिवडणुकीमध्ये युतीच्या दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांची बेरीज केल्यास एकूण पाच लाखांपेक्षा अधिक होतात. परिणामी विजयश्री मिळवणे युतीच्या उमेदवाराला कागदावर कठीण दिसत नाही. शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असून त्याचे पडसाद पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारी ठरविताना उफाळून आल्याचे दिसते.

भाजपच्या ताब्यात असलेली जागा शिवसेनेला देऊ  केल्याने भाजपच्या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व मंडळ अध्यक्षांनी प्रथम राजीनामा सत्र उगारले होते. तरीदेखील देश पातळीवर युती टिकविणे आवश्यक असल्याने पालघरच्या जागेचा आग्रह भाजप नेत्यांना सोडावा लागला आहे. या बदललेल्या परिस्थितीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्याशिवाय जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सेना-भाजपमध्ये लढत होत असे. जिल्हा परिषद सभापती निवडणुकीत भाजपने सेनेला दोन वेळा डिवचले होते. त्यामुळे युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांचे स्पर्धक म्हणून पाहत असून उभयतांमध्ये सुसंवाद राहणार नाही असे एकंदरीत दिसते. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमधील नाराजीचे काय होते व दोन्ही पक्षांमध्ये असलेले अंतर्गत वादविवाद मिटवण्यास पक्षातील वरिष्ठ नेत्यांना कितपत यश येते यावर या मतदारसंघात युतीच्या उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे.

विरोधकांची एकी

हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने आगामी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. माजी खासदार बळीराम जाधव, माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांच्यासह सहा नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिल्याने या पक्षाच्या सुमारे ७० हजार मतांची भर बहुजन विकास आघाडीच्या पारडय़ात पडणार आहे. वसई- विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये ठाकूर यांचे असलेले वर्चस्व ही या पक्षासाठी जमेची बाजू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीनेही बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. गेल्या वर्षी पोटनिवडणुकीत ठाकूर यांच्या पक्षाच्या उमेदवाराला दोन लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती. वसई-विरारमध्ये तेव्हा कमी मतदान झाले होते. यंदा वसई-विरारसह माकपची मते, काँग्रेस आघाडीचा पाठिंबा या आधारे २००९ प्रमाणे या मतदारसंघात विजय मिळविण्याचे आमदार ठाकूर यांचे उद्दिष्ट आहे.

शिवसेनेला भाजपची कितपत मदत होते वा विरोधकांमध्ये किती ऐक्य राहते यावर बरीच समीकरणे अवलंबून राहणार आहेत. कागदावर तरी शिवसेना-भाजप युती आता तरी सरस दिसत आहे. या साऱ्या गोंधळात भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचे राजकीय भवितव्य काय, हा प्रश्न कायम आहे.

ग्रामीण भागात कुपोषण, रोजगार, शिक्षण, आरोग्य अशा अनेक समस्या आहेत. त्याचबरोबरीने नागरी समस्यांसह मच्छीमारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. माझ्यावर शिवसेनाप्रमुखांनी विश्वास दाखवून पुन्हा एकदा उमेदवारी दिली तर या सर्व समस्या सोडवण्यासाठी माझा अग्रक्रम राहील. गेल्या वर्ष दीड वर्षांत मी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा केला असून नागरिकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला आहे.    – श्रीनिवास वनगा, संभाव्य उमेदवार, शिवसेना

मला खासदारीची संधी मिळाल्यानंतर केंद्रातील योजना ग्रामीण पातळीपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मिळालेल्या अवधीत संपूर्ण मतदारसंघ फिरून आणि लोकांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. या भागातील आदिवासी बांधव, शेतकरी, नोकरदारवर्ग, मच्छीमार बांधव तसेच नागरी भागात अनेक समस्या असून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला.   – राजेंद्र गावित, खासदार